पुणे, प्रतिनिधी – देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. फिटजी पुणे इन्स्टिट्यूटच्या सुमारे १२१ विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या निकालात उत्कृष्ट कामगिरी केली असून ते आता जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. श्यामानंद काटे, सोहन कोल्हे या दोन्ही विद्यार्थ्यांनी या निकालात ९९.९ पेक्षा जास्त गुण मिळवत आकाशाला गवसणी घातली.
देशपातळीवर श्यामानंद काटे या पुण्यातील विद्यार्थ्याने ९९.९३३६५८४ गुण मिळवत १२१६ वा क्रमांक मिळवला तर सोहन कोल्हे याने ९९.९२५६१०३ गुण मिळवत १३२५ क्रमांक पटकावला. फिटजीच्या पुणे शाखेतील ४ विद्यार्थ्यांनी विविध विषयामंध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले. यामध्ये गणित आणि भौतिकशास्त्राशी निगडित विषय होते. तसेच १७ विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा जास्त गुण मिळवले तर ४२ विद्यार्थ्यांनी या निकालामध्ये ३०००० पर्यंत क्रमांक मिळवले.
फिटजी पुणे केंद्र प्रमुख तथा भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख राजेश कर्ण हे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिंनदन करत म्हणाले की, देशपातळीवर ५०० क्रमांकाच्या आत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. योग्य नियोजन, अधिक अंमलबजावणी, अचूक विश्लेषण करत अधिक परिश्रम करत ९२ टक्के पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत अभूतपूर्व यश संपादित करू शकतात.
श्यामानंद काटे म्हणाला की, माझ्या या यशामध्ये मला माझ्या पालकांची तसेच फिटजीच्या प्राध्याकांची मोलाची साथ मिळाली. जेईई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये १०० क्रमांकाच्या आत येण्याचे माझे अंतिम लक्ष आहे. या निकालामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.
सोहन कोल्हे म्हणाला की, माझ्या शिक्षक आणि पालकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळणे मला शक्य झाले. अत्यंत नियोजनबद्ध प्रशिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा, नियमित शंका निरसन यामुळे मला यंदाच्या परीक्षेत चांगले यश
मिळाले.


