पुणे : ‘लोकशाही करण्या बळकट, बांधूनी मोट, करू एकजूट, हक्काने तुम्ही करा मतदान पुणे शहराची वाढवू शान ..शंभर टक्के करू मतदान हा जी जी’ … असे सांगत पिढ्यानपिढ्या जनजागृती चे माध्यम असणाऱ्या पोवाड्याच्या माध्यमातून पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि प्रबोधन मंच, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी बागेसमोर मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे आणि पोवाडा प्रशिक्षण वर्गातील सेवाव्रती शाहीर यांनी यावेळी पोवाड्याचे सादरीकरण केले. यावेळी प्रा. संगीता मावळे, प्रा. रुपाली देशपांडे, प्रबोधिनीचे सचिव अरुणकुमार बाभुळगावकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. युवा शाहीर होनराज मावळे, अक्षदा इनामदार, सक्षम जाधव यांनी साथसंगत केली.
सुजाण नागरिक बनुया, मतदान नक्की करुया…आम्ही नागरिक भारताचे, मतदान हे कर्तव्य आमुचे…शंभर टक्के करु मतदान, लोकशाहीची वाढवू शान… असा संदेश यावेळी देण्यात आला.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, तुम्हाला सरकारकडून अनेक अपेक्षा असतात, हक्काने अनेक गोष्टी मिळाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी हक्काने मतदान देखील केले पाहिजे. योग्य सरकार निवडण्याची ही संधी न गमावता मतदान केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.


