Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्वशांती रत्न’ पुरस्काराच्या निमित्ताने... - ...

विश्वशांती रत्न’ पुरस्काराच्या निमित्ताने… – – गिरीश दाते माईर्स एमआयटी,

पुणे

‘सद्गुणांची पूजा हीच ईश्वरपूजा’ ही भावना मनाशी बाळगून सातत्याने कार्यमग्न असणार्‍या आदरणीय प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड सरांसारख्या बहुआयामी व विविध पैलू असलेल्या व्यक्तिबद्दल थोडक्यात काही लिहिणे, हे खरोखरच अवघड आहे. काही विशिष्ट तत्त्वांवर श्रध्दा ठेवून त्यानुसार कार्य करत असलेले प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर हे मला एक कार्यशील तत्त्वचिंतक वाटतात.
नुकतेच, अमेरिकेतील उटाह राज्यातील ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटी ह्या प्रसिध्द विद्यापीठाने, सरांच्या चार-साडेचार दशकांच्या शिक्षण व विश्वशांतीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘डी.लिट.’ ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. त्याचे निमित्त करून पुणे शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार आणि त्यांना ‘विश्वशांती रत्न’ ह्या विशेष पुरस्काराने सन्मानित करायचे योजले आहे. दि. ३० मे २०२४ रोजी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात होणार्‍या एका भव्य समारंभात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
आदरणीय डॉ. कराड सरांबरोबर गेली अनेक वर्ष काम करायचे भाग्य मला लाभले आहे. साहजिकच, एक व्यक्ती म्हणून कराड सर कसे आहेत, ह्याबद्दलचे माझे विचार ह्या पुरस्काराच्या निमित्ताने मला शब्दांकित करावेसे वाटले.
एक शिक्षक, एक दूरदर्शी शिक्षणतज्ञ, एमआयटी सारख्या भारतातल्या एका आघाडीच्या शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष, स्वतः वास्तुरचनाकार किंवा बांधकाम तज्ञ नसूनही, जगातल्या सर्वात मोठ्या घुमटासह अनेक सुंदर व देखण्या वास्तूंचे संकल्पक, रचनाकार व निर्माते, भारतीय समाजात व पर्यायाने संपूर्ण जगात शांती संस्कृती रुजावी ह्या विचाराचे आग्रहपूर्वक पुरस्कर्ते, भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानावर निष्ठा बाळगून त्याचा प्रसार व प्रचार करणारे एक ध्येयवादी तत्त्वचिंतक ह्या आणि अशा कितीतरी विविध पैलूंनी आदरणीय कराडसरांचे व्यक्तिमत्त्व घडलेले आहे.
साधारण १९६० च्या दशकाच्या पूर्वाधात, डॅा. विश्वनाथ कराड सर हे पुण्याच्या कॅालेज अ‍ॅाफ इंजिनिअरिंग मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. अत्यंत सचोटीने आणि तळमळीने शिकवणारे व्याख्याते आणि पुढे प्राध्यापक म्हणून ते नावाजले गेले. एखाद्या शिक्षकाच्या कर्तृत्वाची खरी ओळख म्हणजे त्याने घडवलेले विद्यार्थी आणि त्यांच्याकडून त्या शिक्षकाला मिळत असलेला मान! प्रा. कराड सर ह्या दोन्ही निकषांवर श्रेष्ठ ठरतात. त्यांच्याकडून शिकलेले कित्येक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारत आणि भारताबाहेर अत्यंत उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यातील कित्येक जण आवर्जून कराड सरांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायला आजही येताना दिसतात, तेव्हां ते दृश्य खूप गहिवरून टाकणारे असते.
कोणत्याही विशिष्ट धर्माच्या श्रध्दांना व विश्वासांना तडा न देता काही पायाभूत भारतीय मूल्ये शिक्षण पद्धतीत आणण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. कराड सरांनी आपल्या विविध शिक्षणसंस्थांमधून केल्याचे आढळते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड सर हे एक भारलेले व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही विषयाचा त्यांनी एकदा ध्यास घेतला की त्याची पूर्तता झाल्याशिवाय ते त्याची कास सोडत नाहीत. सुमारे चार दशकांपूर्वी त्यांनी एमआयटी शिक्षण संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयांमधून ‘मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धती’ रुजावी असा ध्यास घेतला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या सर्व शिक्षणसंस्थांमधून अभ्यासक्रमाचा अथवा दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मूल्यसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षणपद्धती ही केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर प्रस्थापित व्हावी ह्याबद्दल त्यांना वाटत असलेली तळमळ आणि त्यासाठी ते करत असलेले अविरत प्रयत्न हे आदर्शवत असेच आहेत असे मला मनापासून वाटते. ह्याच त्यांच्या अविरत ध्यासाची दखल घेऊन अमेरिकेतील विद्यापीठाने त्यांचा सन्मान केला असावा.
विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासानेच Holistic Development) त्यांच्यामध्ये विजिगिषु वृत्ती ( Winning Personality ) निर्माण होऊन ते खर्‍या अर्थाने जगाचे नागरिक ( Global Citizens ) म्हणून विकसित होतात, असा कराड सरांचा ठाम विश्वास आहे आणि त्यानुसार ते सतत कार्यशील असतात.
आज आपले जग हे सतत ताणतणाव, हिंसा, रक्तपात, संघर्ष व संशयाच्या वातावरणात वावरत असलेले दिसून येते. विद्यार्थ्यांना सर्वंकष मूल्याधारित शिक्षण न प्राप्त होणे आणि ज्या वयात त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत त्या वयात ते न होणे हे कदाचित जगभरात चालू असलेल्या सततच्या हिंसाचाराचे मूळ असू शकते. म्हणूनच आदरणीय डॉ. विश्वनाथ कराड सर यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर त्या त्या देशाच्या मूल्यांशी पूरक असलेले मूल्याधिष्ठित परंतु वैश्विक स्तरावरचे शिक्षण प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत समाविष्ट करावे अशी सततची मागणी विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून केली आहे.
एक विशिष्ट तात्विक भूमिका घेऊन डॉ. कराड सर आजतागायत कार्यरत राहिले आहेत. ज्ञानाधिष्ठित भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार त्यांनी सातत्याने केला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व इतर भारतीय संत हे केवळ ‘संत’ नसून ‘तत्त्वज्ञ संत’ आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना मान्यता मिळाली पाहिजे हा आग्रह त्यांनी धरला आहे. भारताची ओळख संपूर्ण जगाला खर्‍या अर्थाने सर्व प्रथम करून देणारे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद हे कराड सरांचे आदर्श असून त्यांच्या ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान व शांती नांदेल’ या वचनावर आधारित त्यांनी एमआयटी सारख्या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. एकविसाव्या शतकात भारत ‘विश्वगुरु’ म्हणून ओळखला जाईल या स्वामी विवेकानंदांच्या वचनावर पूर्ण श्रध्दा ठेवून स्वामीजींचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
‘स्वराज्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी करणारच’ अशी स्फूर्तिदायक प्रतिज्ञा सर आपल्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी उच्चारून घेतात. सर्वधर्मसमभावावर विश्वास असणार्‍या कराड सरांना ‘धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवनग्रंथ’च आहेत असे वाटते.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम ह्यांच्या नावाने सर्वात मोठा घुमट त्यांनी पुण्यात उभारला आहे. ‘अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा’ असे ह्या विश्वशांती घुमटाला संबोधले जाते. अध्यात्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या एकत्र येण्याने विश्वशांतीचा मार्ग सुकर होतो, हे ह्यामागील तत्त्व आहे. ह्या घुमटामध्ये मानवी इतिहासातील श्रेष्ठ असे संत, तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचे पुतळे उभारुन, ‘एकं सत् विप्रा बहुधा वदंति’ हा प्राचीन भारतीय संदेश पुनःप्रसारित करायचा प्रयत्न केला आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा सन्मान केवळ पुणेकर नागरिकच नाही, तर ते ज्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकले, त्या कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देखील केला जात आहे, ही भाग्याची गोष्ट आहे.
?????

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments