*
पुणे, दि. 10 जून – संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची आज नितांत गरज आहे, त्यादृष्टीने सर्वच शाळांमधून संस्कृतविषयी जागृती केल्यास नव्या पिढीला त्याचे महत्व समजू शकेल आणि आपल्या देशाच्या उज्वल परंपरेचे दर्शन सातत्याने जगासमोर येईल, असे प्रतिपादन डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे यांनी आज येथे बोलतांना केले.
श्रीगीतामंजूषामंथनचे पंचविसावे विशेष पुष्प कौशलम् न्यासाच्या पुढाकारातून व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारत विकास परिषद आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. त्यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृत आणि पुराण विद्या अभ्यासक प्रणव गोखले, कौशलम् न्यासाच्या विश्वस्त रोहिणी कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पांडे पुढे म्हणाले की, संस्कृतसाठी डेक्कन क़ॉलेजला भारत सरकारने विशेष अनुदान दिले आहे. गीतामंजूषा स्पर्धेसारखे विविध उपक्रम समाजात राबवले पाहिजेत. आज परदेशात देखील संस्कृतचा वापर केला जात आहे, अशावेळी आपल्याकडे मात्र मोठ्या प्रमाणावर समाज जागृतीची गरज आहे.
ही आगळीवेगळी संकल्पना राबवणार्या कौशलम् न्यासाच्या संरक्षिका व माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांनी यावेळी माहिती देतांना सांगितले की, आपल्या प्राचीन इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरांची किमान माहिती सर्वांना व्हावी या हेतूने 2018 पासून गेली 6 वर्षे श्रीगीतामंजूषामंथन स्पर्धा घेण्यात येत आहे. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमावेळी मात्र राम-कृष्ण-शिव-भगवती हे विषय घेतलेले होते व हे चार विषय चार गटांना वाटून दिले होते. लवकरच याच धर्तीवर उपनिषदावर आधारित प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विशेष उपक्रम घेण्याचा मानस आहे.
या स्पर्धेत डॉ. शैलजाताई कात्रे, डॉ. ज्योत्स्नाताई खरे, डॉ. माधवीताई गोडबोले, डॉ. मंजिरीताई भालेराव यांनी परीक्षक म्हणून तर गटप्रमुख म्हणून मानसी मेढेकर, राधिका आडिवरेकर, उज्वला दाबक, अनघा भातखंडे यांनी काम पाहिले. प्रत्येक गटात 15 विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते. प्रश्नकर्त्या म्हणून आनंदी जोगदेव, डॉ. मानसीताई रांजणीकर, शामला बर्वे यांनी काम पाहिले. श्रीराम गटातील हुजूरपागा शाळेच्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी प्रथम क्रमांक तर श्रीकृष्ण गटातील नागरिकांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आणि गट सहभागींना प्रमाणपत्र, तुळशीचे रोप व विशेष पारितोषके देण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. भालेराव यांनी मूर्तीशास्त्राच्या आधारे शिव या विषयावर दृक-श्राव्य सादरीकरण देखील केले. सुनिता फडके यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. वैशंपायन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—————————–
संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराची नितांत गरज – डॉ. प्रमोद पांडे*
RELATED ARTICLES


