मुंबई, ११ जून, २०२४: मजेंटा मोबिलिटी या एकात्मिक मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने टाटा एस ईव्हीच्या १००हून अधिक युनिट्सचा समावेश आपल्या ताफ्यात करून भारतातील व्यावसायिक वाहनांची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससोबतची भागीदारी अधिक दृढ केली आहे. यामध्ये ६०हून अधिक युनिट्स एस ईव्हीचे आहेत, तर ४०हून अधिक युनिट्स अलीकडेच बाजारात आलेल्या एस ईव्ही १०००चे आहेत. दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून ही वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत. या करारात क्रांतिकारी टाटा एस ईव्हीच्या ५०० युनिट्सचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मजेंटा मोबिलिटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मॅक्ससन लेविस यांनी सहयोगाबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “टाटा मोटर्ससोबत सहयोग अधिक दृढ करता आला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. भारतभरात सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत वाहतूक उत्पादने देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा यामुळे विस्तार झाला आहे. तैनात करण्यात आलेल्या १०० हून अधिक टाटा एस ईव्ही ही आमच्या महत्त्वाकांक्षी ‘अब की बार दस हजार’ कार्यक्रमातील लक्षणीय झेप आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत १०,००० इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. टाटा मोटर्सच्या चारचाकी छोट्या व्यावसायिक वाहनांमधील (एससीव्ही) आमच्या लॉजिस्टिक्स, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक क्षमतांसह ही भागीदारी नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी सज्ज आहे.”
टाटा मोटर्सच्या एससीव्हीपीयू विभागाचे व्यवसाय प्रमुख तसेच उपाध्यक्ष श्री. विनय पाठक या घोषणेबद्दल म्हणाले, “मजेंटा मोबिलिटीशी झालेल्या आमच्या सहयोगातील एक महत्त्वाचा टप्पा आम्ही पार केला असून, त्यांच्या ताफ्यात टाटा एस इव्हींचा समावेश झाल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. प्रगत, शून्य-उत्सर्जन वाहतूक उत्पादनांच्या माध्यमातून शहरांतर्गत वितरणामध्ये क्रांती घडवून आणण्याचे आमचे सामूहिक उद्दिष्ट यामुळे अधोरेखित झाले आहे. एस ईव्ही हे आमच्या सहनिर्मिती प्रयत्नांतून तयार झालेले उत्पादन अद्वितीय कामगिरी, विश्वासार्हता आणि कार्यात्मक कार्यक्षमता देऊ करते. त्याचबरोबर भारताच्या पर्यावरणपूरक भवितव्यामध्ये योगदान देते. शाश्वत ई-कार्गो वाहतूकीची साधने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याप्रती आमची बांधिलकी या वाहनांच्या समावेशातून सिद्ध झाली आहे. आम्ही एकत्रितपणे अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक व पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक भारताच्या भवितव्याचा मार्ग खुला करत आहोत.”
एस ईव्हीमध्ये ईव्होजेन पॉवरट्रेनची शक्ती आहे. हे इंजिन ड्रायव्हिंगचा अफलातून अनुभव देते. बॅटरीची ७ वर्षांची वॉरंटी आहे, तर ५ वर्षांचे सर्वसमावेशक देखभाल पॅकेज यासोबत मिळते. यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात सुरक्षिततेही हमी मिळते. यामध्ये प्रगत बॅटरी कूलिंग प्रणाली तसेच रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आहे. त्यामुळे ड्रायव्हिंगची कक्षा विस्तारली जाऊ शकते. या बॅटरीचे चार्जिंग नियमितपणे व वेगाने करणे शक्य आहे. त्यामुळे चार्जिंगमध्ये फार वेळ जात नाही. २७ किलोवॉट (३६ एचपी) क्षमतेची मोटर यात आहे, १३० एनएमचा सर्वोच्च टॉर्क आहे. त्यामुळे सर्वोत्तम पिक-अप मिळतो तसेच वाहन पूर्ण भरलेले असताना सहजगत्या चढ पार करून देण्याची क्षमता मिळते. सुमारे १०० टक्के अपटाइमसह दमदार कामगिरी करणाऱ्या या वाहनाला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
मजेंटा मोबिलिटीला प्रतिष्ठित गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये एचपीसीएल, बीपी, मॉर्गन स्टॅनले, जितो अँगल नेटवर्क आणि प्रसिद्ध भारतीय अमेरिकी फिलांथ्रोपिस्ट डॉ. किरण पटेल यांचा समावेश आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहतूक क्रांतीच्या अग्रभागी आहे. भारतातील वाहतूक क्षेत्रात शाश्वतता व नवोन्मेषाला चालना देण्यासाठी कंपनी अनेक उपक्रमांचे नेतृत्व करत आहे. टाटा मोटर्ससोबतच्या सहयोगाचा विस्तार करत तसेच १०० टाटा एस ईव्हींचा समावेश आपल्या ताफ्यात करत कंपनीने वाहतूकीद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याप्रती बांधिलकी दाखवून दिली आहे.


