Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedआसाम सेवा हक्क आयोगाच्या पथकाची विभागीय आयुक्त कार्यालयास भेट*

आसाम सेवा हक्क आयोगाच्या पथकाची विभागीय आयुक्त कार्यालयास भेट*

*

पुणे, दि. १९: आसाम राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती मोनिका बोर्गोहेन आणि आसाम राज्य सेवा हक्क आयोगाच्या उपसचिव श्रीमती मिताली लाहकार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयास भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये राज्याच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची आणि त्याच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे, उपआयुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा, आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाद्वारे अधिसूचित केलेल्या २८ सेवांच्या अंमलबजावणीची माहिती सदस्यांना दिली. अधिनियमाद्वारे अधिसूचित केलेल्या सेवा, त्यांचा कालावधी, त्यासाठी जबाबदार अधिकारी तसेच सेवा न मिळाल्यास करावयाचे अपील यासंबधी तपशीलवार माहिती त्यांनी दिली. अधिनियमातील तरतूदींची विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात येतो असे डॉ.पुलकुंडवार म्हणाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवर विशेष उपक्रमाद्वारे प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचले आणि विविध विभागाच्या सेवा देण्यात येऊन प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आले आहे. गतवर्षी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा महिना उपक्रमाद्वारे विभागात ६ लाख ३७ हजार २५१ सेवा ऑफलाईन तर ३ लाख ५२ हजार ६८७ सेवा ऑनलाईन देण्यात आल्या आहेत. विभागात ७ हजार २६३ आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत असून त्याच्यामार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. चालू वर्षी मे २०२४ अखेर विभागातील आपले सरकार, सेतू केंद्र माध्यमातून प्राप्त ७ लाख १८ हजार १३ अर्जांपैकी ७ लाख १४ हजार ६८३ प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहितीही यावेळी श्री.पुलकुंडवार यांनी दिली.

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त श्री. शिंदे यांनी आयोगाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. आयोगाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असून, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे नागरिकांना विविध सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या सेवांची माहितीही यावेळी शिंदे यांनी आयोगाच्या सदस्यांना दिली.

या भेटीतून उपयुक्त माहिती मिळाली असून आसामच्या नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रीया श्रीमती बोर्गोहेन यांनी दिली. यावेळी त्यांनी विविध प्रमाणपत्र वितरणासंबंधीच्या ऑनलाईन प्रक्रियेची माहिती घेतली.

*जिल्हाधिकारी कार्यालयास भेट*

आयोगाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन, लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये नागरिकांना जिल्हास्तरावर देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी अधिनियमातील तरतूदीनुसार नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हास्तरावर नियमित आढावा घेण्यात येतो असे सांगितले. यावेळी तालुकास्तरावर देण्यात आलेल्या सेवांचीही माहिती देण्यात आली.

यानंतर आसामच्या पथकाने पुणे महानगरपालिकेला भेट देवून अधिकाऱ्यांशीदेखील सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत संवाद साधला. उपायुक्त प्रतिभा पाटील, राजीव नंदकर यांनी पथकाला माहिती दिली.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments