Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*छत्रपती शिवरायांचा आणि मराठ्यांचा इतिहास संपूर्ण भारतात शिकवला जावा - अविनाश धर्माधिकारी*

*छत्रपती शिवरायांचा आणि मराठ्यांचा इतिहास संपूर्ण भारतात शिकवला जावा – अविनाश धर्माधिकारी*

पुणे, दि. 20 जून – छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास भारतातील सर्व विद्यापीठांमधून शिकवला जाण्याची गरज आहे, हा इतिहास केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर तो अखिल भारतीय स्वरुपाचा राष्ट्रीयत्वाचा गौरवशाली इतिहास आहे, तो सर्वत्र मांडला गेला पाहिजे, अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आज येथे व्यक्त केली.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व मुरकुंबी इतिहास उपक्रम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सात ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन आज येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त), भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्‍वस्त प्रदीप रावत, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, मुरकुंबी इतिहास प्रकल्पाचे नरेंद्र मुरकुंबी, लेखक डॉ. जयश्री साठे, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. मैत्रेयी देशपांडे, सोनिया खरे व डॉ. केदार फाळके उपस्थित होते.
यावेळी धर्माधिकारी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. महाराजांची युध्दनिती, गनिमी कावा, अर्थनिती, समाजकारण, प्रशासन, राज्यव्यवहार याची साद्यंत माहिती भारतातील सर्वच शाळा, विद्यापीठांमधून शिकवली जावी. मराठ्यांच्या इतिहास हा वैभवशाली आहे तर शिवाजी महाराज हे राष्ट्रीयत्वाचे प्रतिक आहेत. महाराजांनी सर्वंकष क्रांती करुन दाखवली. संतांच्या सांस्कृतिक उर्जेचे महाराजांनी भगव्या क्रांतीत रुपांतर केले. नव्या भारतात आता लेखणीने आणि बुध्दीने लढावे लागणार आहे. दुर्दैवाने आज विकृत आणि असत्य इतिहास सर्वत्र शिकवला जात आहे, यासाठी देखील आपल्याला लढावे लागेल.
यावेळी सर्वांचे स्वागत करतांना रावत म्हणाले की, राजकीय हिंदुत्वाशिवाय सांस्कृतिक हिंदूत्व शक्य नाही, त्यासाठी इतिहासातून बोध घ्यायला हवा. प्रखर राष्ट्रवादाचा सत्य इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठीच प्रदीर्घ संशोधनातून या सर्व ग्रंथांची निर्मिती झाली आहे. असे उपक्रम देशभर व्हायला हवेत. आजच्या कार्यक्रमात शिवभारतम्चा इंग्रजी अनुवाद, गागाभट्टविरचीत शिवराजाभिषेक प्रयोग: चिकीत्सक आवृत्ती, शिवराज्याभिषेक नव्या युगाचा प्रारंभ, इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी, बुधभूषण ग्रंथाचा मराठी आणि इंग्रजी अनुवाद, ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड 18 व 19 असे सात ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी हसबनीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आज भारतीय सैन्यात देखील दुर्दैवाने शिकवला जात नाही. महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे उदाहरण जगासमोर आणले पाहिजे तर निंभोरकर म्हणाले की, महाराजांच्या दूरदृष्टीचे महत्व समजून घ्यायला हवे. आजच्या युगात देखील त्यांच्या कार्याची बरोबरी जगातील कोणत्याही नेत्याशी होऊ शकत नाही. यावेळी मुरकुंबी यांनी मुंबईत मराठा आरमाराचे भव्य संग्रहालय साकारणार असल्याची घोषणा केली तर यावेळी लेखक, अनुवादक यांची समोयोचित मनोगते झाली. रघुजीराजे आंग्रे यांनी आभार मानले तर मंजूषा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments