गेल्या 38 वर्षांच्या प्रथेप्रमाणे यंदाही ज्ञानदा प्रतिष्ठान तर्फे आषाढी एकादशीनिमित्त पालखी-वारी चे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदाच्या गुरुकुल, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
ज्ञानदाचे हितचिंतक – देणगीदार श्री. नंदकिशोर राठी आणि त्यांचे बंधू श्री रतन राठी यांच्या उपस्थितीमधे शाळेमधे श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा आणि आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. विठ्ठल रखुमाईच्या वेषातील मुलामुलींनी प्रत्यक्ष देवांच्या दर्शनाचा आनंद दिला. वारीमध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी फलकांद्वारे पर्यावरण विषयीचे संदेश दिले.
डी-पी-रस्त्यावरील ज्ञानदापासून निघालेल्या पालखीचे स्वागत आणि पादुका पूजनाचा आनंद नागरीकांनी घेतला. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात परंतु ढोल-ताशाच्या मर्यादित आवाजात मुलींच्या लेझिम पथकाने वारीची रंगत वाढली.
कर्वेनगरमधील विठ्ठल मंदिरामधे पोहोचल्या नंतर संस्थेचे संचालक, आणि शिक्षक वर्गाने श्री विठ्ठलाची आरती केली, तर विद्यार्थ्यांनी भक्तिगीते आणि विठुनामाचा गजर गाऊन आपली भक्ति सेवा अर्पण केली.
सुयोग्य नियोजन, वारी मधील विद्यार्थ्यावरचे शिक्षकांचे नियंत्रण आणि अलंकार पोलीस चौकीमधील पोलीस बांधवांचे मार्गदर्शन यामुळे हा पालखी-वारी सोहळा निर्विधपणे आणि भक्तिरसाच्या आनंदाने संपन्न झाला.


