Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिलांचे सक्रिय योगदानच भारताला विश्वगुरु बनवतील : भाग्यश्री साठ्ये खराडीतील "कर्मयोगीनी"...

महिलांचे सक्रिय योगदानच भारताला विश्वगुरु बनवतील : भाग्यश्री साठ्ये खराडीतील “कर्मयोगीनी” संमेलनाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


खराडी, ९ जानेवारी
महिला संमेलने ही स्त्री शक्तीचा जागर करतील व महिलांना संघटित करतील. त्या भारतीय तत्वज्ञानाचे चिंतन घराघरात करतील व भविष्यात महिलांचे सक्रिय योगदानच भारताला विश्वगुरु म्हणून जगात नावलौकिक मिळवून देईल, असे प्रतिपादन महिला समन्वयाच्या अखिल भारतीय सह संयोजिका भाग्यश्री साठ्ये केले.
राष्ट्रनिर्माणाच्या अमूल्य कार्यात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून विविध क्षेत्रांतील महिलांचे एकत्रीकरण आणि विचार विमर्श व्हावा तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी कर्मयोगीनी- महिला संमेलन खराडीतील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
पुणे महानगराच्या पूर्व भागातील हडपसर ,वडगावशेरी व येरवडा या भागांमध्ये राहणाऱ्या डॉक्टर, पत्रकार, उद्योजिका, शिक्षिका ,संशोधक, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर, गृहिणी, बचतगट, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध कार्यक्षेत्रांतील सुमारे 2100 महिला या संमेलनात सहभागी झाल्या. पद्मश्री शीतल महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. पोलीस अधिकारी मनीषा पाटील, प्रांत संयोजिका सुनीता करपे यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग क्षेत्रात करियर करताना कौटुंबिक, सामाजिक दृष्टीकोण व प्रत्यक्ष या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांना अनेक महत्वाची सूत्रे सांगितली. कौटुंबिक संवाद व चांगला मित्रपरिवार हा मानसिक व भावनिक आवाहने पेलण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समारोपाच्या सत्रात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मोटिव्हेशनल स्पीकर श्वेता शालिनी, सुजाता सातव व अर्पणा पाटील उपस्थित होत्या. मृणाल कुलकर्णी यांनी उपस्थितांना सिनेक्षेत्रातील कष्ट, अस्थिरता व अचूक निवड यांविषयी अनुभव कथन केले. श्वेता शालिनी यांनी देशातील महिलांच्या स्थिती बाबतची आकडेवारी मांडली. महिलांना सक्षमीकरण नकोय, आज त्यांना जागे केले पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या संयोजिका सुजाता सातव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्थानिक महिलांच्या समस्या व त्यावर आधारित चर्चा करून उपस्थित महिलांनी त्यावर उपाययोजना मांडल्या. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम व महिलाकेंद्रीत गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.
संमेलनाचे सुत्रसंचलन श्रावणी कृष्णकांत सातव व प्रियदर्शिनी पाबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. स्वाती नवगिरे , मेनका उमडेकर व मधुताई हुकमनी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments