पुणे, 9 जानेवारी
दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने आयोजित संवर्धिनी महिला संमेलनात विविध वक्त्यांनी आपापल्या क्षेत्रातील महिलांच्या वाटचालीचे अनुभवकथन आणि मार्गदर्शन केले. पर्वती, सिंहगड व कात्रज भागांतील महिलांसाठी आयोजित केल्या गेलेल्या या संमेलनाला सुमारे 1200 महिला उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सहभागाबद्दल आणि त्यासाठी त्यांना कुटुंबातून मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत सकारात्मक मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ‘डिक्की’ संस्थेच्या सीमा कांबळे यांनी प्राचीन काळापासून ते सद्य परिस्थितीपर्यंतचे भारतीय महिलांचे एकूण सामाजिक स्थान कार्य व त्यात होत गेलेले बदल याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्त्रियांचे जीवन दर्शन, जीवन मूल्य आणि जीवन व्यवहार ही संकल्पना मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका वीणा देव यांनी जमलेल्या सर्व विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक केले.
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनिस समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्त्रियांनी करिअर करताना त्यांचे मातृत्व आणि पालकत्व कसे असावे, यावर त्यांनी वैयक्तिक अनुभवाच्या आधारे सांगितले. प्रमुख वक्त्या राष्ट्रीय महिला समन्वयाच्या सह संयोजिका भाग्यश्री साठ्ये यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत विकासात महिलांचे योगदान कसे असावे व त्याचे महत्त्व काय यावर मार्गदर्शन केले.
संमेलनात भारतीय महिलांची समाजातील सद्यःस्थिती तसेच त्यांना येणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण यावर सहभागी महिलांनी चर्चा केली. संमेलनाच्या संयोजिका सारिका महेंद्र वाघ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्कार भारतीच्या कलावंतांनी लक्ष्मी स्तोत्रावर आधारित भरतनाट्यम सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
उद्योजकता, क्रिडा आणि कुटुंबविषयक मार्गदर्शनाला महिलांचा प्रतिसाद संवर्धिनी महिला संमेलनात विविध वक्त्यांचा सहभाग
RELATED ARTICLES


