पुणे,१६ सप्टेंबर २०२४ : ग्योथं – इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) च्या परकीय भाषा विभाग (जर्मन) यांच्यात शिक्षक प्रशिक्षण तसेच कला,साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर ग्योथं – इन्स्टिट्युट,पुणेचे संचालक मार्कुस बीशेलं,उपसंचालक व भाषा विभागाच्या प्रमुख अलिसिया पाड्रोस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) च्या परकीय भाषा विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.स्वाती आचार्य आणि एसपीपीयूच्या रजिस्ट्रार (निबंधक) प्रा.ज्योती भाकरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारामुळे ग्योथं – इन्स्टिट्युटचे डॉईश लेहरेन लेरनेन (डीएलएल -जर्मन भाषा कशी शिकवावी) याबाबत एसपीपीयूच्या परकीय भाषा विभागाशी असलेला सहयोग दृढ होणार असून भविष्यात शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या या विभागातील एम.ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.याशिवाय कला,संस्कृती आणि साहित्याशी संबंधित विविध उपक्रमांबाबत सहयोग केला जाणार असून परकीय भाषा विभागाच्या विद्यार्थ्यांना ग्योथं-इन्स्टिट्युटच्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
ग्योथं-इन्स्टिट्युट पुणेचे संचालक मार्कुस बीशेलं म्हणाले की,पुण्यात जर्मन भाषेचा समृध्द वारसा आहे.विद्यार्थ्यांसाठी यामुळे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून भारत-जर्मनी मैत्री संबंधांमध्ये याचे योगदान आहे. एसपीपीयूसह सहयोग करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असून हा आमच्या संस्थेसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) च्या परकीय भाषा विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.स्वाती आचार्य म्हणाल्या की,डीएलएल कार्यक्रमासाठी प्रायोगिक तत्त्वावर 2021 पासून आम्ही काम सुरू केले असून आजवर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.हा सामंजस्य करार म्हणजे दीर्घकालीन सहकार्यातील एक तार्किक पुढचा टप्पा आहे.यामुळे शाश्वत भागीदारी आणि सहकार्याचा मार्ग खुला झाला आहे.आमच्याकडे आधीपासूनच एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी डायडॅटिक्स (शिक्षणशास्त्र) हा विषय अंतर्भूत आहे.चार सेमिस्टरच्या एमए अभ्यासक्रमामध्ये आता आम्ही अधिकृतपणे डीएलएलचे अनेक पैलू समाविष्ट करू. याशिवाय निवडक विद्यार्थ्यांना ग्योथं- इन्स्टिट्युट पुणेच्या काही अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीची संधी मिळेल.
ग्योथं – इन्स्टिट्युट,पुणेच्या उपसंचालक व भाषा विभागाच्या प्रमुख अलिसिया पाड्रोस म्हणाल्या की ११० वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा पुण्यामध्ये जर्मन भाषा शिकविण्यास सुरूवात झाली. त्यामुळे जर्मन भाषेचा येथे समृध्द वारसा आहे.महाराष्ट्रात जर्मन भाषा शिक्षकांची मागणी वाढत आहे.तसेच जर्मन शिकण्याचा निर्णय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे,त्यामुळे या सहकार्याला औपचारिकता आणण्याची ही योग्य वेळ आहे. ग्योथं-इन्स्टिट्युट ने नेहमीच इतर संस्थांशी जर्मन भाषेबाबत सहयोग केला आहे.आमचे सर्व उपक्रम भागीदारी आणि परस्परतेवर आधारित आहेत.
ग्योथं-इन्स्टिट्युट पुणेचे संचालक मार्कुस बीशेलं पुढे म्हणाले की, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी ची जागतिक पातळीवर कार्यरत एक सक्रिय सांस्कृतिक संस्था म्हणून जर्मनी, युरोप चा जगभरातील देशांशी संबंध दृढ करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो . आमच्या जागतिक नेटवर्क मध्ये 98 देशात ग्योथं- इन्स्टिट्यूटच्या 151 शाखा आहेत, ज्यामध्ये 6 भारतात आहेत .विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांसह आम्ही विद्यार्थी आणि कुशल तंत्रज्ञांना त्यांच्या जर्मनीच्या दिशेने चालू असलेल्या प्रवासात मद
त करतो .


