पुणे, दि. ११ जानेवारी – ’होठों पे गंगा और हाथमे तिरंगा’, अशा नवभारताचे आणि इथल्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत, लोकप्रिय वक्ते, कवी, गीतकार, पटकथाकार मनोज मुंतशीर शुक्ला यांनी भारतीय छात्र संसदेचे चौथे सत्र संस्मरणीय केले. वेदांपासून ते आजच्या आदीरामायण चित्रपटापर्यंतचा विस्तृत पट, मनोज यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने हजारो विद्यार्थ्यांसमोर उलगडला आणि जागोजागी पेरलेल्या त्यांच्या काव्यपंक्तींना विद्यार्थ्यांसह सर्वांनीच टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
आपल्या संस्कृतीतील लोकसंस्कृतीचे सामर्थ्य या विषयावरील सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेत चौथ्या सत्रात आपल्या संस्कृतीतील लोकसंस्कृतीचे सामर्थ्य या विषयावरील सत्रात अभ्यासकांनी विचार मांडले. या सत्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांनी संस्कृतीमधील लोककलांचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड उपस्थित होते.
मनोज यांच्या आगमनानेच छात्र संसदच्या भव्य मंडपात चैतन्य उसळले. ’पाश्चात्य देशांनी आपल्या समृद्ध संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती ठेवल्याने त्यांचे अंधानुकरण करणार्या आपल्यापैकी काहींचेही आपल्या देशाविषयी गैरसमज आहेत, असे सांगून मनोज यांनी इतिहासातील असंख्य उदाहरणे देत, देशप्रेमाचे प्राधान्य समजावून दिले. ’ज्ञानापुढे मानसिक गुलामी टिकू शकत नाही’, असे सांगून भारत या शब्दाचा अर्थच मुळी प्रकाशाच्या दिशेने अविरत जाणारा, असा आहे, असे मनोज म्हणाले. ’संस्कृतीशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नसतो, आपली भारतीय लोकसंस्कृती सदैव सहिष्णू असून, मानवतेला प्राधान्य देणारी आहे, सर्वसमावेशकता हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे’, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुवर मानवेंद्रसिंह म्हणाले, ’लोकसंस्कृतीविना समाज नसतो. संस्कृती संस्कारांतून निर्माण होते. परंपरेने प्रवाहित होते. नव्या युगात संस्कृतीचे अर्थ, मूल्ये वेगाने बदलत आहेत. अशा काळात आपली समृद्ध लोकसंस्कृती, साहित्य, कला हेच आपले आशास्थान आहे. लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपण काळाच्या ओघात निसटलेल्या गोष्टी पुन्हा मिळवू शकतो. आपली सांस्कृतिक एकता लोकसंस्कृतीने टिकवली आहे’.
यावेळी आदर्श युवा आमदार सन्मान बिहारचे आमदार सुधांशू शेखर आणि उत्तराखंड येथील आमदार सुरेश गरिया यांना प्रदान करण्यात आले. डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी स्वागत केले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. ’हार्टफुलनेस’ च्या अंजली बापट यांनी राजयोग ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
अंशुमान पाटील, दिया तोमर, ज्ञानेश्वरी विरोळे आणि आर्या बसारे या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत मांडले.
प्रा. धीरज सिंग यांनी
आभार मानले.


