पुणे,14 ऑक्टोबर 2024 : संधिवात असलेल्या रूग्णांसाठी कार्यरत मिशन आर्थरायटिस इंडिया (माई) आणि सेंटर फॉर ऱ्हयुमॅटिक डिसीज (सीआरडी) यांच्या तर्फे रविवारी वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त पूना क्लब येथे माईंड अँड आर्थरायटिस या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रूबी हॉल क्लिनिकच्या क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ.प्राची साठे यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी मानसोपचारतज्ञ डॉ.मंजिरी दीक्षित,फिजिरोथेरपीस्ट डॉ.अपर्णा साधळे आणि संधिवात तज्ञ डॉ.अरविंद चोप्रा यांसह माईच्या संस्थापिका शरयू भट आणि संधिवात तज्ञ डॉ.वैजयंती लागू व माईच्या अध्यक्षा श्रीमती दीपा मेहता (दृकश्राव्य माध्यमातून) आदी मान्यवर उपस्थित होते.
संधिवात असलेल्या लोकांना संधिवातामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी निरोगी मन आणि तंदुरूस्त शरीराला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी तज्ञांनी व्यक्त केले.याप्रसंगी संधिवात असलेल्या रूग्णांसाठी काही साध्या सोप्या व्यायामांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
संधिवात आणि संबंधित समस्यांच्या विविध पैलूंबद्दल शास्त्रीय माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करून जागरूकता निर्माण करणे हे माई चे उद्दिष्ट आहे.


