Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालकांच्या बदललेल्या वर्तनाकडे लक्ष द्या - आरती पेंडसे

बालकांच्या बदललेल्या वर्तनाकडे लक्ष द्या – आरती पेंडसे

पुणे, “बालकांच्या वर्तनात अचानक झालेल्या बदलांकडे लक्ष द्या ” असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आरती पेंडसे यांनी पालकांना दिला. भारतीय स्त्रीशक्ती जागरण संस्थेने आयोजित ‘आपल्या मुली सुरक्षित आहेत का?’ या विषयीच्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.

मुलींवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यावरील जनजागृतीसाठी हा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चर्चेचे संचालन ॲड. राजश्री ठकार यांनी केले. सहाय्यक पोलिस उप निरीक्षक अश्विनी कट्टेही चर्चेत सहभागी झाल्या होत्या. लैंगिक आत्याचारांपासून बालकांचे (१८ वर्षांपर्यंतच्या मुली व मुले ) संरक्षण करण्यासाठी १९१२ मधे निर्माण केलेल्या पॉस्को या जेन्डर न्यूट्रल कायद्याविषयी ॲड. राजश्री ठकार यांनी सविस्तर माहिती दिली. पॉस्को कायद्यांतर्गत गुन्ह्याची माहिती असलेले कोणीही देऊ शकते. ज्या आस्थापनात अत्याचार घडतो त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. तक्रार दाखल न करणे हा अपराध आहे असे त्या म्हणाल्या.

पोलिस उप निरीक्षक अश्विनी कट्टे म्हणाल्या, “दुर्दैवी घटनांतील अगदी लहान मुलींना काय घडलंय हे कळत नाही आणि सांगताही येत नाही. मुली घाबरलेल्या असतात. अशा वेळी पालकांच्या इच्छेनुसार साध्या वेशात घरी जाऊन, व्हिडीओ कॉलवर किंवा पोलिस ठाण्यातील बालक स्नेही कक्षात तक्रार दाखल करून घेतली जाते, जबाब घेतला जातो. हे सर्व अतिशय संवेदनशीलतेने केले जाते.”
आपल्या मुलांशी संवादाची तसेच त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता तिन्ही वक्त्यांनी अधोरेखित केली. पोहण्याच्या पोशाखाने झाकलेल्या अवयवांना स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला प्रतिकार करणे, बाहेरच्या जगात वावरत असताना घ्यावयाच्या काळजीबद्दल त्यांना समजेल अशा भाषेत सूचना देणे. तसेच पौगंडावस्थेतील मुला मुलींतील आकर्षण व त्यातून कदाचित घडू शकणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भातही मुलांची मानसिकता समजून घेणे, कौशल्याने त्यांना पुढील परिणामांबद्दल जागरूक करण्याची आवश्यकता आरती पेंडसे यांनी पालकांना व शिक्षकांना समजावून सांगितली. त्या म्हणाल्या ” पालक घरी शिक्षक असावा आणि शिक्षक शाळेत मुलांचा पालक असावा!” ‘ ओळख स्पर्शाची ‘ सारखे कार्यक्रम उपयुक्त ठरत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
‘ओळख स्पर्शाची ‘,’ कळी उमलताना असे कार्यक्रम शाळांतून करीत असल्याचे भारतीय स्त्रीशक्ती जागरणच्या अध्यक्ष किर्ती देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सचिव सुनिती पारुंडेकर यांनी आभार मानले तर मेधा वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments