पुणे, प्रतिनिधी
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात १ लाख १० हजारांहून अधिक पुणेकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर गर्दी करीत, पुस्तक खरेदीचा आनंद लुटला. पुणेकरांनी वीकेंडचा मुहूर्त साधत सकाळपासूनच पुणे पुस्तक महोत्सवाला कुटुंबासह भेट दिली. महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनाची तीन भव्य दालने, आकर्षक सजावट, कलाकृती, शिल्प, चित्र, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशा सर्वांचा पुणेकरांनी मनमुराद आनंद लुटला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण फर्ग्युसन महाविद्यालयाचा संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातून नागरिकांना सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याची प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाला शनिवारी सकाळी ११ वाजाता सुरुवात झाली. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. त्यानंतर, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांनी गर्दी केली होती. सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी असल्याने, तसेच, शाळा महाविद्यालयांनाही सुटी असल्याने अनेकांनी सहकुटुंब पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करण्याचा आनंद घेतला. महोत्सवात लहान मुलांच्या पुस्तके विविध दालनांवर उपलब्ध आहे.महोत्सवात पुस्तक खरेदी आणि साहित्याच्या शोधात अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच सहभागी झाले होते. यामध्ये काही दिव्यांग व्यक्तीही त्यांच्या शारीरिक मर्यादांवर मात करीत महोत्सवात आले होते. त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा होता.
………………
चौकट १
अडथळा विरहीत वातावरण
पुस्तक महोत्सवाच्या मडपांची उभारणी करताना अडथळा विरहीत वातावरणाची निर्मिती करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळेच नागरिकांना, विशेषत: दिव्यांगांना अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही. या महोत्सवात रविवारी एक ज्येष्ठ नागरिक ‘इलेक्ट्रिक वॉकर’ घेऊन फेरफटका मारत होते. तर, एक महिला तिच्या तान्हुल्या बाळाला वॉकरमध्ये घेऊन आली होती. या दोघांनाही वॉकर घेऊन जाताना कोठेच अडथळा आला नाही. त्यामुळे त्यांनी संयोजकांचे आभार मानले.
………………..
चौकट २
पुस्तक महोत्सवात खाद्य पदार्थांचे जवळपास ४० स्टॉल असून, महाराष्ट्रातील विविध प्रांतांतील चव या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. नागरिकांनी रविवारी पुस्तक खरेदीबरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही रांग लावली होती.
………………..
चौकट ३
पुणे पुस्तक महोत्सवाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी भेट दिली. या सर्वांनी तिन्ही दालनांना भेट देत, पुस्तक खरेदीचा आनंद घेतला.
……….
कोट
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात एक लाख दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन पुस्तक खरेदीचा आनंद घेतला आहे. पुस्तक महोत्सवात बाल चित्रपट महोत्सव, मुलांसाठी विविध कार्यशाळा, लिट फेस्टिव्हल, खाद्यसंस्कृती अशा सर्वांचा सुरेख संगम अनुभवायची संधी आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकुटुंब पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, वाचन संस्कृतीला पुढे नेण्यासाठी आणि पुणे शहराला नवी ओळख देण्यासाठी पुढे यावे.
– राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
………………..
कोट
..
पुणे पुस्तक महोत्सवाला गेल्यावर्षी आलो होतो. तेव्हाही भरपूर वाचकांची गर्दी पाहायला मिळाली. यंदा ही गर्दी तिप्पटीने वाढली आहे. नागरिक भरभरून पुस्तकांची खरेदी करीत आहे. त्यामुळेच पुस्तक महोत्सवासाठी पुणे हे अत्यंत आदर्श शहर आहे. डिजिटल युगात नागरिकांचा वाचनासाठी असणारा उत्साह हा उल्लेखनीय आहे. महोत्सवासाठी मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक येथून लोक येत आहे. हे महोत्सवाचे यश आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला भरपूर शुभेच्छा.
– विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप
……
कोट
….
पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी आता साद घातली असुन पुणे ही सांस्कृतिक , शिक्षणाचीची नगरी असून, वाचन चळवळीला या महोत्सवामुळे बळ मिळणार आहे. पुण्यात विविध महोत्सव होत असतात. मात्र, पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त असे, दुसरे शहर नाही.पुणेकरांचा ज्ञानासाठीचा उत्साहाचे कौतुक आहे.डिझीटल काळात ग्रंथाचे काय पण वाचन चळवळ टिकविण्याचे काम ही तरुणपिढी करीत आहे. हे महोत्सवाच्या प्रतिसादावरुन दिसून येते.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय विमान नागरी आणि सहकार राज्यमंत्री
……
आज तिसरा विश्वविक्रम होणार
…
पुणे पुस्तक महोत्सवात साधारण ९० हजारांपेक्षा अधिक पुस्तकांनी संविधानाचे शिल्प आज सोमवारी १६ डिसेंबर रोजी साकारण्यात येणार आहे. हा एक विश्वविक्रम राहणार आहे. यावेळी नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा इतिहास आणि त्यांच्याशी निगडित दुर्मिळ वस्तू पाहण्याची संधी आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.


