Sunday, November 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयुर्वेद ही वैज्ञानिक आणि संशोधनातून सिद्ध झालेली वैद्यकीय प्रणाली* डॉ. एस....

आयुर्वेद ही वैज्ञानिक आणि संशोधनातून सिद्ध झालेली वैद्यकीय प्रणाली* डॉ. एस. सारंगपाणी यांचे मत ; मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. कामठे पाइल्स क्लिनिक यांच्या वतीने ‘सुश्रुत पुरस्कार सोहळा

 

 

पुणे : आयुर्वेद ही वैज्ञानिक, संशोधनातून सिद्ध झालेली आणि प्रमाणित वैद्यकीय प्रणाली आहे. आयुर्वेदाला वैज्ञानिक वैद्यकीय प्रणाली म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी आधुनिक संशोधन, वैज्ञानिक वैधता आणि प्रभावी प्रचार आवश्यक आहे. आयुर्वेदाचा अभिमान बाळगण्यासोबतच त्यातील संशोधनाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे मत नॅशनल सुश्रुत असोसिएशन, तेलंगणाचे अध्यक्ष डॉ. एस. सारंगपाणी यांनी व्यक्त केले.

 

मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. कामठे पाइल्स क्लिनिक यांच्या वतीने आयोजित ‘सुश्रुत पुरस्कार २०२६’ सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे यंदा सहावे वर्ष होते. यावेळी आयुर्वेद आणि प्रोक्टोलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ वैद्यकीय मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कोंढवा येथील इंद्रप्रस्थ लँडमार्क येथे हा कार्यक्रम झाला.

 

यावेळी देसाई हॉस्पिटलचे अध्यक्ष राजेश शहा, वरिष्ठ सर्जन डॉ. मीना शेख, पीडीएचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, नितीन पंडित, ऍड. प्रताप परदेशी, नगरसेविका अर्चना जगताप, मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व डॉ. कामठे पाइल्स क्लिनिक प्रा. लि. चे संचालक डॉ. कुणाल कामठे आणि संचालक डॉ. शर्मिला कामठे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात एचएम ट्रान्सपोर्टच्या शालेय बससाठी २१ प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले.

 

डॉ. एस. सारंगपाणी म्हणाले, आयुर्वेदाला वैज्ञानिक वैद्यकीय प्रणाली म्हणून मान्यता मिळाल्याशिवाय आयुर्वेदाचा अभिमान आपण खऱ्या अर्थाने अनुभवू शकणार नाही. आपण जिथे जाऊ, तिथे आयुर्वेदाविषयी बोलले पाहिजे. आयुर्वेदातील आधुनिक संशोधन आणि त्याच्या वैज्ञानिक वैधतेविषयी माहिती दिली पाहिजे. आयुर्वेद ही अत्यंत वैज्ञानिक, संशोधनातून सिद्ध झालेली आणि प्रमाणित वैद्यकीय प्रणाली आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आयुर्वेदाची हीच मूलभूत ओळख आहे.

 

भारत आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि जागतिक स्तरावरील वैद्यकीय केंद्र बनू शकतो. आयुर्वेदाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करून चालणार नाही. आयसीएमआर आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रातील सीसीआरआयएएस या दोन्ही संशोधन संस्थांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यांनी समन्वय साधून संयुक्त संशोधन प्रकल्प राबवले पाहिजेत. अशा सहकार्यपूर्ण संशोधनातूनच भारत आयुर्वेद आणि वैद्यकीय संशोधनाचे उत्कृष्ट केंद्र बनू शकेल.

 

डॉ.राजेश शहा म्हणाले, आपल्याला समाजाकडून जे मिळते ते समाजाला तितक्यात चांगल्या पद्धतीने परत दिले पाहिजे. डॉ. कुणाल कामठे पाइल्स क्लिनिकच्या वतीने देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो हे कौतुकास्पद आहे.

 

डॉ. व्यंकटेश जोशी म्हणाले, आयुर्वेदाबद्दल समाजात एक विशिष्ट धारणा आहे. मात्र, आयुर्वेदाची प्रगती चांगल्या दिशेने होत आहे. आजचा आयुर्वेद हा पूर्वीपेक्षा वेगळा आणि अधिक प्रगत आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात, मेहनत घेत केलेल्या कार्याचे फळ आज दिसत आहे. पूर्वी रक्तदाब तपासण्यासाठी डॉक्टरांकडे जावे लागत असे; मात्र आज बारावी उत्तीर्ण व्यक्तीदेखील रक्तदाब तपासू शकते. आयुर्वेदाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. आयुर्वेद शरीरासोबतच आध्यात्मिक आणि भावनिक स्तरावरही कार्य करतो. त्यामुळे आयुर्वेदाचा योग्य वापर आणि त्याचा व्यापक प्रचार करणे गरजेचे आहे.

 

या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार नॅशनल सुश्रुत असोसिएशन, तेलंगणाचे अध्यक्ष डॉ. एस. सारंगपाणी आणि डॉ. जोशीज होलिस्टिक मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, मुंबईचे संचालक डॉ. व्यंकटेश जोशी यांना प्रदान करण्यात आला.

 

सुश्रुत रत्न पुरस्कार अग्निकर्म तज्ज्ञ डॉ. उदय तळहर, अ.भा.आ.सं., नवी दिल्ली येथील शल्य तंत्र विभागाचे प्रमुख डॉ. योगेश बडवे आणि श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालय संचालक डॉ. आबासाहेब गडदे यांना देण्यात आला. प्रोक्टोलॉजी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथील शल्य तंत्र विभागाचे उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ. अमरप्रकाश द्विवेदी आणि इंटरनल मेडिसिन अँड पाइल्स हॉस्पिटल, लखनौचे डॉ. संजीत साहू यांचा गौरव करण्यात आला.

 

आयुर्वेद आयकॉन पुरस्कार बी.एस.डी.टी. आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्राध्यापक डॉ. रेणुका गायळ आणि ओजस आयुर्वेद सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगावचे संचालक डॉ. महेश बिर्ला यांना प्रदान करण्यात आला. कोंढवा गौरव पुरस्कार वरिष्ठ चिकित्सक डॉ. कृष्णकुमार बैकर आणि वरिष्ठ चिकित्सक डॉ. विजय जाधव यांना देण्यात आला. आशिष जरड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्मिला कामठे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments