पुणे : अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम सोमवार, दिनांक २२ जानेवारी रोजी विराजमान होणार आहेत. यानिमित्त राज्यातील सर्व कत्तलखाने मांसाहार विक्री केंद्र आणि दारू विक्री केंद्र एका दिवसासाठी बंद ठेवावेत, अशी विनंती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शेखर मुंदडा म्हणाले, सध्या संपूर्ण जगभर राममय वातावरण झाले आहे. सर्व रामभक्त हे रामनामात तल्लीन झाले आहेत. प्रभू रामचंद्र श्री अयोध्या येथे विराजमान होण्याचा क्षणही समीप आला आहे. जनभावनेचा कौल लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यात आली असून २२ जानेवारी रोजी राज्यातील सर्व कत्तलखाने, मांसाहार विक्री केंद्र आणि दारु विक्री केंद्र त्या एक दिवसासाठी बंद ठेवावे, असे निवेदन दिले आहे.


