Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेडिओतून शॉक बसला अन् आवाजाकडे आकर्षित झालो’ ‘पुणे लिट फेस्ट’वर प्रसिद्ध...

रेडिओतून शॉक बसला अन् आवाजाकडे आकर्षित झालो’ ‘पुणे लिट फेस्ट’वर प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हरीश भिमानी यांनी उलगडला जीवनपट

पुणे, २२ डिसेंबर : ‘लहानपणी रेडिओतून येणारे आवाज आवडायचे, पण रेडिओवर बोलणारे लोक कोण असतात, असा प्रश्न पडायचा. आईने गम्मत म्हणून रेडिओच्या आत छोटे लोक बोलत असतात, असे सांगितले. त्यामुळे एकदा कुतूहलाने रेडिओ उघडला अन् शॉक बसला. त्यानंतर वडिलांनी रेडिओसमोर बसवून हिंदी प्रचार समितीचे कार्यक्रम ऐकवले अन् आवाजाच्या जादुई दुनियेकडे आकर्षित झालो,’ असा किस्सा सांगत प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हरीश भिमानी यांनी रविवारी आपला जीवनपट उलगडला. ‘शब्द आणि स्वर ही माझे साधने आहेत,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

दूरदर्शनवर गाजलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेचा ‘मै समय हूँ’ अशा धीरगंभीर निवेदनाने प्रारंभ करणारे हरीश भिमानी यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये पुणेकरांशी संवाद साधला. लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘लता दीदीः अजीब दास्तां है ये’ हे पुस्तक लिहिणाऱ्या हरीश भिमानी यांनी रेडिओची आवड, लहान मुलांसाठी केलेले कार्यक्रम, दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून काम केल्यावर मिळालेली प्रसिद्धी, लता मंगेशकरांसोबत केलेले सांगितिक कार्यक्रम, ‘महाभारत’ मालिकेतील निवेदनाचे काम असा कारकिर्दीचा पट रंजक शब्दांत पुणेकरांसमोर मांडला.

‘नमस्कार’ असे आपल्या खास शैलीदार आवाजात म्हणत हरीश भिमानी यांनी पुणेकरांशी संवाद साधायला सुरुवात केली. मुंबईत बालपणी अचानक एका शाळेत दुसऱ्या इयत्तेत जाऊन बसलो. ‘मै बडा हो गया हूँ, मुझे यही क्लास अच्छी लगती है’ असे शिक्षकांना सांगितले. तेव्हा मला केवळ कच्छी भाषा यायची. परंतु, माझी शिकण्याची आवड पाहून शाळेने मला दुसऱ्या इयत्तेत दाखल करून घेतले,’ अशी आठवण त्यांनी सांगितली. ‘इंजिनिअरिंग केल्यावर मी एका कंपनीत नोकरी करत होतो. परंतु, पटकथा, संवाद, दिग्दर्शनाच्या आकर्षणामुळे मी नोकरी सोडली. दूरदर्शन सुरू होण्यापूर्वी सरकारच्या ‘साइट’ उपक्रमात मी लहान मुलांसाठी छान कार्यक्रम तयार केले. दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून लोकप्रियता मिळवली. त्यातून माझा चेहरा आणि आवाज लोकासंमोर आला अन् मी कळत-नकळत स्वरविश्वात रमलो,’ असेही त्यांनी सांगितले.

‘रेडिओवर ‘कोहिनूर गीत गुंजार’ हा कार्यक्रम ऐकून साक्षात लता मंगेशकर यांनी आपल्या सांगितिक कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांच्यासोबत २१ देशांमध्ये १४३ सांगितिक कार्यक्रमांचे निवेदन केले. ‘संगीत के सात सूर, संगीत के सात अक्षर, लता मंगेशकर’ असा मी केलेला परिचय लतादीदींना खूप आवडायचा,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली. संवादाच्या समारोपावेळी ‘मै समय हूँ’ हे गाजलेले निवेदन त्यांनी सादर केले अन् पुणेकरांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments