Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठी भाषेचे वैभव तरुणांपर्यंत पोहोचविले पाहिजे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ...

मराठी भाषेचे वैभव तरुणांपर्यंत पोहोचविले पाहिजे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर : पुणे नगर वाचन मंदिराचा १७७ वा वर्धापन दिन : पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : मराठी साहित्य हे मराठी भाषेचे वैभव आहे, परंतु सध्याच्या काळामध्ये मराठी साहित्य तरुण पिढीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही. त्यामुळे तरुण पिढी एक प्रकारे मराठी भाषेपासूनच दूर राहते. मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी या भाषेचे वैभव आधुनिक माध्यमांबरोबरच विविध प्रकारे सध्याच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले.

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या १७७ व्या वर्धापन दिनानिमित्त वाचन संस्कृती साठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहंदळे, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. लक्ष्मण थोरात यांना डॉ. श्री. व्यं. केतकर पुरस्कार, आशा भट्ट वेलणकर यांना ऍड. शरद तपस्वी पुरस्कार आणि डॉ. राहुल देशपांडे यांना कवी ह.स. गोखले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. डॉ. राहुल देशपांडे यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री निर्मला देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, साहेब संस्कृतीकडून जर समाज सेवा संस्कृतीकडे गेला. तर खऱ्या अर्थाने समाजाची उन्नत होते. अशा सेवा संस्कृतीला आपले जीवन वाहिलेल्या श्रेष्ठ लोकांमुळे पुणे नगर वाचन मंदिरासारखी संस्था निर्माण झाली. या संस्थेमुळे समाजाला संस्थात्मक कामाची किती गरज आहे हे दिसून येते. मराठी भाषा ग्रंथालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम पुणे नगर वाचन मंदिर संस्थेने केले आहे. त्यामुळे या संस्थेचे केवळ मराठी भाषा समृद्ध करण्यामध्येच नाही तर मराठी संस्कृती समृद्ध करण्यातही मोठा वाटा आहे.

राहुल देशपांडे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी देशपांडे यांनी त्यांचे मनोगत वाचून दाखविले. त्यात संत साहित्याचा माझ्यावर मोठा पगडा आहे. संत साहित्याच्या संस्कारामध्येच मी वाढलो आहे. चिकित्सक भावनेने संत साहित्याचा अभ्यास केल्यामुळे संत साहित्य आणि मराठी भाषेचे वैभव मला खऱ्या अर्थाने कळाले. मी माझ्या साहित्याच्या माध्यमातून हे वैभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे देशपांडे यांचे मनोगत होते.

आशा भट्ट वेलणकर म्हणाल्या, बुधवार पेठेतील महिलांमध्ये आरोग्य पर्यावरण शिक्षण जागृती व्हावी, यासाठी आम्ही काम करत आहोत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण जरी कमी होत असले तरी मूळ समस्या मात्र कमी झालेले नाही ही समस्या दूर करण्यासाठी समाजाने अशा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तसेच हा बदल करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे ही आवश्यक आहे.

लक्ष्मण थोरात म्हणाले, मोबाईल आणि ऑनलाइन बुक्सच्या जमान्यामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवण्याचे महत्वपूर्ण काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे. या संस्थेचा प्रतिष्ठित पुरस्कार मला मिळाल्यामुळे एक प्रकारे माझ्यावरील जबाबदारी वाढलेली आहे.

मधुमिलिंद मेहंदळे म्हणाले, पुणे नगर वाचन मंदिर तरुणांमध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी संस्थेने विविध भागांमध्ये बालसाहित्य संमेलने आयोजित केली होती, याला समाजाचा मोठा प्रतिसाद ही मिळाला होता. तसेच डिजिटल माध्यमातूनही मराठी साहित्य तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे नगर वाचन मंदिर प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना निश्चितच यश मिळत असून मराठी वाचन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

याप्रसंगी, पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने ऑनलाइन मराठी अध्ययन प्रकल्पाचे, प्रातिनिधीक स्वरूपात उद्घाटन, प्रमुख पाहुणे कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्णा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. मधुमिलिंद मेहंदळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संगीता पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments