Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी...

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन…

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२५ – महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सहकारी आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन होणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अरूण लाड, उमा खापरे, जयंत आसगावकर, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, महेश लांडगे, राहुल कुल, अण्णा बनसोडे, बापूसाहेब पठारे, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासणे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.

पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला बचत गटांच्या उत्पादनांना एक खुले व्यासपीठ महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे महिला बचत गट सक्षम बनत असून त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना प्रसिद्धीदेखील मिळत आहे. पवनाथडी जत्रेत वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे अर्ज सादर केले होते. त्यानुसार सुमारे ७५० बचत गटांना लकी ड्रॉ द्वारे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध भागातील पारंपरिक लोककलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक लोककलांचे सादरीकरण लोककलाकार याठिकाणी सादर करणार आहेत. याशिवाय नागरिकांना विविध खाद्यसंस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाचीही मेजवानी मिळणार आहे.

पवनाथडी जत्रेमध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २१ फेब्रुवारी रोजी समर्थ प्रोडक्शन्स प्रस्तुत मराठमोळी संस्कृती जतन करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची गौरवधारा’ आयोजित करण्यात आला आहे. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘मेरा भारत महान’ हा देशभक्तीपर गीतगायनाचा बहारदार कार्यक्रम सादर होईल. तर २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एस. के. कांबळे प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच पवनाथडीच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जगतसुंदरी हा लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. विजयकुमार उलपे हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.

सलग चार दिवस चालणाऱ्या या पवनाथडी जत्रेस सुमारे तीन ते पाच लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या नागरीकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या जत्रेस भेट द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments