राजे शिवराय प्रतिष्ठान, कर्वेनगर तर्फे आयोजन ; तेलंगणाच्या रणरागिणी माधवी लता, मोहन गुजराथी यांची उपस्थिती
पुणे : देशाच्या रक्षणार्थ वीरमरण पत्करलेले भारतीय लष्करातील जवान हुतात्मा अमर पवार यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम करणा-या सेवा आरोग्य फाऊंडेशनला स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार कर्वेनगरमधील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे प्रदान करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रविवार, दिनांक ९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता जय शिवराय चौक, कर्वेनगर येथे पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी दिली.
शिवजयंती महोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी निमित्ताने कर्मभूमी किल्ले महेश्वर व धर्मभूमी काशी विश्वेश्वर यांची प्रतिकृती व माहितीपट देखील सादर होणार आहे. यावेळी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तेलंगणाच्या रणरागिणी माधवी लता या प्रमुख वक्ते असून प्रबोध उद्योग समूहाचे संचालक मोहन गुजराथी हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी वीरपत्नी कोमल अमर पवार या पुरस्कार स्विकारणार आहेत.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रा.स्व. संघ संभाजी भाग कार्यवाह रवी लाटे, उद्योजक प्रल्हाद बोराडे, गणेश पलांडे, मकरंद केळकर उपस्थित राहणार आहेत. दि. ९ ते १७ मार्च दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांचे आयोजन संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष अतुल गोणते, उत्सवप्रमुख अमित जाधव यांसह कार्यकर्त्यांनी केले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


