पुणे : जपान मधील टोकियो शहरात उभारले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन आज दिनांक ८ मार्च रोजी होणार आहे. कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, श्री गोविंदगिरीजी महाराज, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, जपानचे मंत्री, टोकियो शहराचे महापौर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जपानचे माजी आमदार व यदुगोवा कल्चरल सेंटरचे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक यांचे सहकार्य स्मारकासाठी मिळाले आहे.
हेमंत जाधव म्हणाले, जपानमधील या स्मारकाचे मुख्य आकर्षण हे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि इतिहासातील मौल्यवान साधनांचा संग्रह असलेले संग्रहालय आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात येणारे परदेशातील हे पहिले स्मारक आहे. या स्मारकाच्या निमित्ताने जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना एकत्र करण्यात आले असून मराठ्यांच्या इतिहासाची ओळख जपानी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. या अध्यासन केंद्राद्वारे मराठी भाषा आणि मराठ्यांचा इतिहास याचा प्रचार होईल. तसेच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या पर्यटन उद्योगाला देखील या निमित्ताने चालना मिळणार आहे.
व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने जपानी विद्यापीठांबरोबर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून या सहकार्यातून महाराष्ट्रातील तरुणांसाठी जपानमधील रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. हे स्मारक केवळ एक प्रतीक नसून भारतीय व जपानी नागरिकांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंधांना नवीन उंचीवर नेण्याचा एक महत्त्वकांक्षी उपक्रम ठरणार आहे.


