Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसज्जनशक्तीचे एकत्रीकरण आणि जनजागृतीने पुणे पुन्हा बदलेल* *विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मत...

सज्जनशक्तीचे एकत्रीकरण आणि जनजागृतीने पुणे पुन्हा बदलेल* *विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मत ; वेध अस्वस्थ मनाचा – आवाज महाराष्ट्राचा, आवाज सर्वसामान्य माणसाचा या परिसंवादाचे आयोजन*

 

 

पुणे : पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरची माणसे आली आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष होत आहे. पुण्यासाठी गंभीर मुद्दा हा मादक द्रव्यांचा विळखा आहे. शाळेतील मुले यामध्ये आहेत. याविरोधात लढा देण्याची गरज आहे. ‘उज्वल पुणे’ साठी नियोजन पुणेकरांना करायचे आहे. पुणे भौगोलिक दृष्टीने वाढत आहे. जनजागृती आणि सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणाने पुन्हा बदल घडेल, असा सूर ‘वेध अस्वस्थ मनाचा’ या परिसंवादात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या विचारांतून उमटला.

 

वेध अस्वस्थ मनाचा – आवाज महाराष्ट्राचा, आवाज सर्वसामान्य माणसाचा या परिसंवादाचे आयोजन पराग ठाकूर, शिरीष मोहिते, उदय जगताप आणि समस्त पुणेकरांच्यावतीने टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ राजकीय नेते माधव भंडारी, माजी महापौर अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, व्याख्याते गणेश शिंदे आदी सहभागी झाले होते.

 

माधव भंडारी म्हणाले, कोणत्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता असेल तरी त्याने भान सोडून बोलणे चुकीचे आहे. आताच्या काळात अनेक मंडळी बोलतात, जे सकाळ संध्याकाळ बोलतच असतात. सुसंस्कृतपणा काय असतो, हे पाहिले तर आज तो राज्यात राहिला आहे का नाही, हा प्रश्न आहे. पुण्यासाठी गंभीर मुद्दा हा मादक द्रव्यांचा विळखा आहे. शाळेतील मुले यामध्ये आहेत. याविरोधात लढा देण्याची गरज आहे. त्याकरिता खासगी शैक्षणिक संस्थाच्या व स्वायत्त विद्यापीठ यांच्या प्रमुखांना एकत्र आणायला हवे. त्यातून मार्ग निघेल.

 

अंकुश काकडे म्हणाले, पुण्याचा विकास झाला पण आपण आनंदी व समाधानी आहोत का? सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे या मध्ये खूप फरक झाला आहे. प्रगती झाली पण आपली दुरवस्था झाली. आपण सगळे त्याला कारणीभूत आहोत. देशामध्ये जेवढे पक्ष त्यांना सत्ता राबविण्याची संधी मिळाली. मात्र, राजकीय पक्षात वाचळवीर किती आहेत, कार्यकर्ते यांच्यावर जरब नाही, ही आजची परिस्थिती आहे. सर्वच क्षेत्रातील वाईट परिस्थिती बदलण्याकरिता पुणेकरांचा सहभाग मिळणे गरजेचे आहे.

 

सूर्यकांत पाठक म्हणाले, पोलिसांचा धाक राहिला आहे का? हा प्रश्न समोर आहे. पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरची माणसे आली आहेत. त्यातून उद्भविणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सज्जनशक्ती निष्क्रिय होत असून दुर्जन शक्ती वाढत आहे. त्याकरिता सज्जनशक्ती सबळ व्हायला हवी.

 

संदीपसिंह गिल म्हणाले, पुण्यात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत गेले. आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर फसवणूक हे जेष्ठ नागरिक आणि शिकलेल्या लोकांसोबत होत आहेत. घरफोडी प्रकार हे वाढताना दिसत आहेत. रात्री प्रमाणे दिवसा देखील हे होत आहेत. पालकांनी मुलांचे चांगले मित्र व्हायला हवे. पालक मोबाईल मध्ये व्यस्त झाले आहेत. शालेय मुलांच्या दप्तरात कोयते व धारदार शस्त्रे सापडतात. याची तपासणी पालक व शिक्षकांनी करायला हवे. मुलांची संगत देखील बघायला हवी. उज्वल पुण्यासाठी नियोजन पुणेकरांना करायचे आहे.

 

गणेश शिंदे म्हणाले, इतिहासाकडे किती पहायचे, हे वक्ते आणि श्रोत्यांनी ठरवायचे असते. गेल्या अनेक दिवसांपासून महापुरुषांवर अनेकजण बोलतात. श्रोत्यांच्या टाळ्यांवर वक्ते वाहवत जातात. त्यावर अंकुश असायला हवा. येणाऱ्या पिढ्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचविणे, याची सामूहिक दखल घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात उदय जगताप म्हणाले, आज बोलताना विचार करावा लागत आहे. समोर दिसणारे चित्र हे अत्यंत वेदनादायी असून सर्वासामान्यांना आवाज नाहीसा झाला आहे. हरवलेले पुणे, मरणासन्न अवस्थेत असलेले पुणे, हरविलेली संस्कृती याचे मूळ शोधण्याचा हा प्रयत्न आहे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या शैक्षणिक विषयासंदर्भात पुढील दोन महिन्यात कार्यक्रम घेतला जाईल, असे शिरीष मोहिते यांनी सांगितले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments