पुणे – लेखनामुळे चिंतन आणि सर्जनशीलता वाढते. त्याआधारे लेखक आणि कवी हे राष्ट्राच्या उभारणी आणि विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, हे आपल्याला इतिहासातून समजते. साहित्यिक-लेखकांचे हे महत्त्व ओळखून नव्या पिढीने लेखनाकडे वळायला हवे, असे मत राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी शनिवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे विद्यापीठात ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेचे आयेजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मलिक यांनी हे विचार मांडले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, न्यासाचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मलिक यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना लेखन प्रक्रियेतील बारकावे सांगितले. लेखक आणि कवींच्या ऐतिहासिक कार्याचे दाखले देत, ससंदर्भ व पुराव्यांसह केल्या जाणाऱ्या लेखनाचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. लिहिताना अत्यंत जबाबदारीने पुरेशी तयारी करून, नवलेखकांनी आपले विचार प्रत्यक्षात उतरवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे भाषिक कौशल्यांवर मोठा परिणाम होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पुस्तक महोत्सवाद्वारे वाचनसंस्कृतीमध्ये वृद्धी होत आहे. त्या अनुषंगाने नवे लेखक तयार करणारी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरत असल्याचे मत कुलगुरू डॉ. गोसावी यांनी मांडले. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वृद्धींगत व्हावी,
संशोधनाधारित लेखनप्रक्रियेची शास्त्रशुद्ध माहिती घेत विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळावे. त्यासाठी आपली निरीक्षणे आणि कल्पनाक्षमता प्रभावीपणे वापरावी, असे आवाहनही डॉ. गोसावी यांनी केले.
पांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनाविषयीची आपली भूमिका मांडली. नवलेखकांना प्रोत्साहन देताना त्यांना योग्य वेळी चांगले मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात कार्यशाळा महत्त्वाची ठरण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. भोसले यांच्या ‘मैं जिंदा हूँ’ या काव्यसंग्रहाचे या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. मंठाळकर यांनी आभार मानले.


