पुणे, ता.१७ : जनसमुदायासाठीचे लेखन करताना नेमकी काय काळजी घ्यावी… लेखनाची शैली सुधारण्यासाठीचे नेमके तंत्र आहे तरी काय…. लेखनाची खोली आणि त्याचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधनाच्या पातळीवर नेमकी काय खबरदारी घ्यावी… लेखन प्रक्रियेशी संबंधित या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेखक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी मिळाली. लेखनाचे तंत्र आणि त्यासाठी पद्धत त्यांनी समजून घेतलीच, त्यासोबतच त्यांनी शब्दप्रभु होण्यासाठीचा मंत्रही समजून घेतला.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे पुणे विद्यापीठात ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेचा सोमवारचा तिसरा दिवस उपस्थित विद्यार्थ्यांसमोर लेखनप्रक्रियेचे बारकावे उलगडवून दाखवणारा ठरला. कार्यशाळेच्या दिवसभरातील सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे, मुक्तपत्रकार आणि मनोरंजन माध्यमांसाठीचे लेखक अभिजित पेंढारकर, ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक माधव गोखले, संशोधक डॉ. केदार फाळके आदी मान्यवरांनी लेखनप्रक्रियेशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
ब्रह्मे व पेंढारकर यांनी ‘मुद्रितशोधन’ या विषयावर मार्गदर्शन करताना विविध उदाहरणांच्या मदतीने नेहमीच्या लेखनामध्ये होणाऱ्या चुकांची माहिती दिली. या चुका टाळण्यासाठी गरजेच्या खबरदारीबाबतही त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. चांगला लेखक होण्यासाठी गरजेच्या असलेल्या चांगल्या वाचनसवयी आणि लेखनामधील सातत्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गोखले यांनी ‘संपादन व स्वयंसंपादन’ या विषयावर मार्गदर्शन करताना साधे आणि सोपे लिहिण्याचे महत्त्व विषद केले. स्वयंसंपादनाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी लेखनाविषयीची स्पष्टता असणे, ससंदर्भ लेखन करणे, शुद्धलेखनासाठी आग्रही राहणे आणि लेखनामध्ये संक्षिप्तता आणण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. चांगला लेखक होण्यासाठी शब्द आणि भाषेवर प्रेम करण्यासोबतच विचारांमध्ये सूसुत्रता ठेवत प्रवाही आणि नेमकेपणाने लिहिण्यावर भर देण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
तर डॉ. फाळके यांनी संशोधनपर लेखनासाठी गरजेचे असणारे स्वतःचे आकलन, वेगळा विचार, अभ्यासामधील खोली आदी बाबींविषयी विद्यार्थ्यांना विस्ताराने माहिती दिली. ऐतिहासिक सत्ये तपासण्यासाठी कागदपत्रांच्या छानणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. त्या आधारे इतिहासविषयक, तसेच संशोधनपर लेखन अधिक सुस्पष्ट करण्याची पद्धतही त्यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितली. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचेही सर्व मान्यवरांनी समाधान केले. कार्यशाळेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी सोमवारी विद्यापीठामध्ये ‘हेरिटेज वॉक’चेही आयोजन करण्यात आले होते.
०००
लेखन सरावसत्रे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी रविवारी दुपारनंतर लेखनाची सरावसत्रेही आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ज्येष्ठ संहितालेखक अभिराम भडकरमकर, कवी-गझलकार प्रदीप निफाडकर, कादंबरी लेखक समर, कथाकार नितीन थोरात, लेखक प्रणव पाटील, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध गटांमधून आपल्या लेखनाचा सराव केला. या सरावसत्रांमधून मिळालेले मार्गदर्शन, तसेच कार्यशाळेच्या इतर सत्रांमधून लेखनाविषयी होत असलेला सातत्याचा पाठपुरावा नव्या दमाच्या लेखकांसाठी प्रोत्साहक ठरत असल्याचे या कायर्शाळेमध्ये अनुभवायला मिळत आहे.
०००


