पुणे,30 एप्रिल 2025 : कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय),पुणे तर्फे हॉटेल हयात रिजन्सी येथे खाणकाम आणि बांधकाम उपकरणे क्षेत्रातील संधी या विषयावर विशेष कार्यक्रम संपन्न झाला. सीआयआयचे राष्ट्रीय स्तरावर एक समर्पित खाणकाम आणि बांधकाम उपकरणे विभाग (एमसीईडी – मायनिंग ॲन्ड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट डिव्हिजन) कार्यरत आहे.या विभागातर्फे नवी दिल्ली येथे 19 मे 2025 रोजी वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यात झालेला कार्यक्रम हा या शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा एक भाग आहे.
या कार्यक्रमामध्ये टीकेआयएल इंडस्ट्रीज (पूर्वीचे थिस्सेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया) चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भाटिया, सँडविक मायनिंग ॲन्ड रॉक टेक्नोलॉजी इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष मनोजित हलदर, सीआयआय पूर्व विभागाचे क्षेत्रीय संचालक जॉन कुरूविला,सँडविक एसआरपीचे अध्यक्ष व कंट्री हेड अशोकतारू चट्टोपाध्याय,इनोव्हेशन कंट्रोल्स येथील भारत व असियान विभागाचे व्यवसाय प्रमुख हरप्रीत वहान आणि सीआयआयच्या उपसंचालिका झोहा खुर्शीद आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताचे उत्पादन क्षेत्राचा सध्या जीडीपीमध्ये 16 टक्के वाटा आहे. हे योगदान 25 टक्के पर्यंत वाढवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनातून,खाणकाम आणि बांधकाम उपकरणे (एमसीई) क्षेत्र या विकास मार्गामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज आहे.
या क्षेत्राचे महत्त्व ओळखून, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) चे खाणकाम आणि बांधकाम उपकरणे विभाग आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्याच्या उद्देशाने एक व्यापक कृती आराखडा तयार करत आहे.यामध्ये एक सकारात्मक धोरण व नियामक वातावरण निर्माण करणे,निर्यातीला चालना देणे,देशांतर्गत उत्पादन क्षमता बळकट करून आयात अवलंबत्व कमी करणे,प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि मुख्य औद्योगिक कार्यात शाश्वतता अंर्तभूत करणे यांचा समावेश आहे.
एमसीडी विभागात खाणकाम,शोध,सल्लागार,संशोधन व विकास उपक्रम व संबंधित सेवांमध्ये गुंतलेल्या आघाडीच्या संस्थांचे प्रतिनिधित्व आहे.या विभागाने यांत्रिकीकरण,आधुनिकीकरणाला चालना देण्यात आणि उत्पादक,पुरवठादार आणि सरकार यांच्यातील मुल्यवर्धक दुवा म्हणून काम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


