रस्ते, पूल, बोगदे आणि संबंधित पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारी एक अग्रगण्य एकत्रित नागरी बांधकाम कंपनी असलेल्या रवी इन्फ्राबिल्ड प्रोजेक्ट्स लिमिटेडने ₹1,100 कोटींपर्यंत निधी उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO)मार्फत भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.
डी अँड बी (D&B) अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 अखेर एकूण ऑर्डर बुक आणि निव्वळ नफा (PAT) या निकषांनुसार, ही कंपनी इंजिनीअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) क्षेत्रातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून उदयास आली आहे.
या IPO अंतर्गत ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या समभागांचा एकूण ₹1,100 कोटींचा ताजा समभाग इश्यू समाविष्ट आहे. या इश्यूमध्ये कोणताही विक्रीसाठीचा प्रस्ताव (Offer for Sale – OFS) नाही.
या इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधी नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी, उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करून थकबाकी कर्जाची परतफेड/भरणा करण्यासाठी, काही कर्जांची परतफेड करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
31 डिसेंबर 2024, 31 मार्च 2024, 31 मार्च 2023 आणि 31 मार्च 2022 रोजी कंपनीचे एकूण ऑर्डर बुक अनुक्रमे ₹3,092 कोटी, ₹2,396 कोटी, ₹1,782 कोटी आणि ₹1,603 कोटी इतके होते, आणि 31 मार्च 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत याचा CAGR (वर्षांकित वृद्धिदर) 22.26% इतका होता. FY 2022, FY 2023, FY 2024 आणि 31 डिसेंबर 2024 अखेरीस कंपनीचा Total Order Book to Bill Ratio अनुक्रमे 1.45 पट, 1.75 पट, 1.72 पट आणि 3.01 पट होता.
कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) या शेअर बाजारांवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
या इश्यूसाठी मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स लिमिटेड आणि ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.
रवी इन्फ्राबिल्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड ही एक नागरी बांधकाम अर्थात, सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी असून, ती मुख्यतः सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांसाठी रस्ते, महामार्ग, पूल, उड्डाणपूल आणि बोगदे यांच्या विकासामध्ये कार्यरत आहे. दोन दशकांहून अधिक अनुभवाच्या बळावर, कंपनीने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक भारतीय राज्यांमध्ये आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.
कंपनी EPC (इंजिनीअरिंग, खरेदी आणि बांधकाम), तसेच हायब्रिड ॲन्युईटी मॉडेल्स अशा विविध कार्यपद्धतींमध्ये काम करते. तिच्या प्रकल्प पोर्टफोलिओमध्ये भारतमाला परियोजना, NHAI (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया), IRCTC, MoRTH (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय) आणि विविध राज्य सरकारांतर्गत प्रकल्प यांचा समावेश आहे.


