नवी दिल्ली, 30 मे 2025: तमिळनाडू ऑनलाइन गेमिंग प्राधिकरणाने(TNOGA) अभिप्राय व्यापार ॲप्सवर कठोर कारवाई केली आहे. प्रोबो, एमपीएल आणि स्पोर्ट्सबाझी यांसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मसह 15 कंपन्यांना राज्य जुगार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या निर्णायक कारवाईमुळे तमिळनाडूमध्ये अनेक प्लॅटफॉर्म्सचे कामकाज थांबले आहे, आणि उद्योगांतील सूत्रांनुसार, आणखी काही प्लॅटफॉर्म लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. हे ॲप्स अनेकदा “प्रिडिक्शन मार्केट्स” च्या नावाखाली सुरू असतात आणि वापरकर्त्यांना खेळ, निवडणूक,मनोरंजन इ. क्षेत्रांतील विविध घटनांच्या बायनरी निकालांवर खऱ्या पैशांची पैज लावायची संधी देतात. हे ॲप्स “शेअर्स(लाभांश)” किंवा “पॉइंट्स(प्रोत्साहन बिंदू)” सारख्या दिशाभूल करणाऱ्या संज्ञा वापरून आपले खरे आर्थिक व्यवहार लपवतात आणि नियामनातील त्रुटींचा फायदा घेतात. यामुळे ग्राहकांना खूप मोठा आर्थिक धोका निर्माण होतो. हे लक्षात घेतले पाहिजे की तमिळनाडूमध्ये कायद्याद्वारे जुगार प्रतिबंधित आहे आणि येथील कायद्यांनुसार केवळ कौशल्याच्या खेळांचे नियमन केले जाते.
ऑपिनिअन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सची राष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तपासणीनंतर ही कारवाई झाली आहे, कारण त्यांच्यावर नियमन संदिग्ध क्षेत्रामध्ये काम करत असल्याची टीका होत होती. अलीकडेच, सेबीने सार्वजनिक समुपदेशन जारी करून गुंतवणूकदारांना सावध केले होते की यापैकी कोणतेही प्लॅटफॉर्म बाजार मध्यस्थ म्हणून नोंदणीकृत नाहीत. सेबीने स्पष्ट केले की, घटनांच्या निकालांवर खऱ्या पैशाची पैज लावणे हे नियंत्रणाखालील वित्तीय रोख्यांच्या परिघात येत नाही आणि यामुळे आर्थिक नुकसान आणि फसवणुकीचा मोठा धोका असतो. वित्तीय नियामकाने देखरेखीच्या अभावावर आणि हे ॲप्स कायदेशीर “प्रिडिक्शन मार्केट्स” च्या नावाखाली वापरकर्त्यांची दिशाभूल करू शकतात यावर भर दिला.
न्यू इंडियन कन्झ्युमर इनिशिएटिव्ह(एनआयसीआय) चे प्रवक्ते, श्री. अभिषेक कुमार यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना म्हटले, “टीएनओजीएची ही कारवाई ऑप्शनल ट्रेडिंग ॲप्सच्या फसव्या पद्धतींपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे प्लॅटफॉर्म सहजसोप्या पद्धतीने मिळणाऱ्या नफ्याची खोटी प्रलोभने दाखवून विशेषकरून तरुणांना लक्ष्य करतात. ऑप्शनल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती हा एक राष्ट्रीय चिंतेचा मुद्दा असला तरी, आम्ही इतर राज्यांना तमिळनाडूच्या नेतृत्वाचे अनुकरण करून नागरिकांना या बेकायदेशीर ॲप्सपासून वाचवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करतो.”
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स( सीएआयटी) देखील या प्लॅटफॉर्ममुळे निर्माण झालेल्या धोक्यांविषयीची जागृती वाढवण्यात आघाडीवर आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, संस्थेने ग्राहक व्यवहार मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना तपशीलवार निवेदने सादर केली आहेत, ज्यात देशभरात या प्लॅटफॉर्म्सवर तातडीने बंदी घालण्याची वकिली केली आहे.
तमिळनाडूची ही कारवाई हरियाणा आणि छत्तीसगडमधील तत्सम उपायांशी जुळते, जिथे अधिकाऱ्यांनी आधीच अनियंत्रित जुगार प्लॅटफॉर्मवर निर्बंध लादले आहेत. राज्य स्तरावरील याबाबतील वाढत असलेले एकमत अशा ॲप्सच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी एका समन्वयित राष्ट्रीय आराखड्याची तातडीची गरज हिरीरीने दाखवून देते. तमिळनाडूची ही सक्रिय भूमिका केवळ ग्राहकसुरक्षेला बळकट करीत नाही, तर डिजिटल जुगार प्लॅटफॉर्म्सच्या बेधुंद प्रसाराला आळा घालण्यासाठी इतर राज्यांसाठी एक सशक्त आदर्शदेखील निर्माण करते.


