Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorized३७व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व कलादालनात ५ प्रदर्शनांचे आयोजन

३७व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व कलादालनात ५ प्रदर्शनांचे आयोजन

३७ वा पुणे फेस्टिव्हल यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांबरोबरच बालगंधर्व कलादालन येथे सलग दहा दिवस विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांमध्ये प्रेस फोटोग्राफरचे फोटो प्रदर्शन व स्पर्धा, महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांचे व्यंगचित्र प्रदर्शन, युनेस्कोने वारसा घोषित केलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील पेंटिंग्जचे प्रदर्शन, वारली आणि आदिवासी पेंटिंग्जचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे तर पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे पेंटिंग्जचे प्रदर्शन भांडारकर इन्स्टिट्यूटच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. ही सर्व प्रदर्शने रसिकांसाठी विनामूल्य असतील, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई व माजी नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.

 

 

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने पुण्यातील प्रेस फोटोग्राफरने काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन गुरुवार, २८ ऑगस्ट ते शनिवार, ३० ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते सायं. ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ४४ प्रेस फोटोग्राफर्स सहभागी झाले असून, विविध विषयांवरील १२ इंच x १८ इंच आकाराचे २५० हून अधिक फोटो प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याचे उद्घाटन गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता खा. प्रणिती शिंदे करणार आहेत. यातील उत्कृष्ट तीन फोटोंना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी याचे आयोजन केले असून दत्तात्रय आढाळगे हे याचे समन्वयक आहेत.

 

 

 

मुंबईच्या कलावंत उल्का देवरुखकर यांचे “वारली लोककला – महाराष्ट्राची अस्सल ओळख” हे वारली पेंटिंगचे प्रदर्शन रविवार, ३१ ऑगस्ट व सोमवार, १ सप्टेंबर या दोन दिवशी सकाळी १० ते सायं. ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ५० हून अधिक कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडल्या जाणार आहेत. याच दोन दिवशी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू तालुक्यातील २० आदिवासी कलावंत बालगंधर्व कलादालन येथे प्रत्यक्ष आपली वारली पेंटिंग्जची कला सादर करणार आहेत. पुण्यातील म्युझियम क्युरेटर पुष्पलता मडावी यांनी याचे संयोजन केले आहे.

 

 

 

युनेस्कोने १२ किल्ल्यांना ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित केले असून त्यातील ११ महाराष्ट्रात आहेत. या किल्ल्यांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन मंगळवार, २ सप्टेंबर व बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न होईल. आकृती ग्रुपतर्फे होणाऱ्या या प्रदर्शनात महिला व पुरुष असे मिळून ५० हून अधिक कलाकार सहभागी होणार असून एकूण ६० हून अधिक पेंटिंग्ज चा समावेश यात असेल. निवेदिता प्रतिष्ठानच्या अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे. या स्पर्धात्मक अंगात ३ पारितोषिके व १ उत्तेजनार्थ पारितोषिक दिली जातील. त्यात अनुक्रमे ३,००० / २,००० / १,००० व ८०० रुपये रक्कम रोख वा वस्तुरूपात दिली जाणार आहे. मिलिंद भांजी किल्ल्यांचे लाईव्ह पेंटिंग डेमो सादर करून प्रेक्षकांना ऐतिहासिक वारशाची अनुभूती देतील.

 

 

 

महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’च्या सहकार्याने ‘कार्टूनोत्सव’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन गुरुवार, ४ सप्टेंबर व शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात रसिकांसाठी खुले असेल. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील आघाडीच्या ३५ व्यंगचित्रकारांची सुमारे २०० हून अधिक चित्रे प्रदर्शित होणार असून, विविध शैलीतील हास्यचित्रे, राजकीय, सामाजिक तसेच अर्कचित्रे अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. याशिवाय मा. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, वसंत सरवटे, हरिश्चंद्र लचके, शाम जोशी, गावणकर इत्यादी मागील पिढीतील काही दिग्गज व्यंगचित्रकारांची निवडक चित्रे असतील. याचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी.द. फडणीस करणार आहे.

 

 

 

‘पुन:’ या फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार, २९ ऑगस्ट ते रविवार, ३१ ऑगस्ट या तीन दिवशी सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले आहे. ‘रीव्हिजिटिंग पुणे थ्रू द लेन्स ऑफ आदी चोरडिया’ या शीर्षकाखाली ५००० हून अधिक छायाचित्रांमधून निवडलेली मंदिरे, वाडे, ऐतिहासिक बाजारपेठा आणि ब्रिटीशकालीन वास्तूंची निवडक छायाचित्रे प्रदर्शित होणार आहेत. तसेच या काळात दररोज सायं. ४ ते ७ या वेळेत कलाकार संवाद सत्र होणार असून या प्रदर्शनाचे संयोजन आदी चोरडिया यांनी केले आहे.

 

 

 

“पुन: हे माझे नम्र परंतु प्रामाणिक प्रयत्न आहे. या उपक्रमातून मी तुम्हाला त्या पुण्याच्या आत्म्याच्या प्रवासाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे—ज्याबद्दल मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पुण्याची संस्कृती आणि वारसा फक्त स्मरणात न राहता लोकांना अनुभवता यावा, त्याच्याशी जोडता यावे, या तीव्र इच्छेतून या वारसा फोटोग्राफी प्रदर्शनाचा जन्म झाला. फोटोग्राफी आणि वारसा या दोन्हींबद्दल आवड असणारा एक तरुण म्हणून मला जाणवलं की पुण्यातील अनेक ऐतिहासिक वाडे, मंदिरे, स्मारके झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे मोडकळीस येत आहेत किंवा नामशेष होत आहेत. शहर बदलत असताना हे वारशाचे ठसे कायम राहणार नाहीत, या जाणिवेने मी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्धार केला. आणि अशा प्रकारे या प्रकल्पाची सुरुवात झाली. आपण जेव्हा जगभर प्रवास करतो, तेव्हा इतर शहरं आपला वारसा किती जपून ठेवतात याचं कौतुक वाटतं. त्यामुळे पर्यटन वाढतं, रोजगारनिर्मिती होते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्या शहरांच्या कथा जिवंत राहतात. मग पुण्यात हे का घडू नये? ‘पुन:’च्या माध्यमातून मी फक्त इमारती टिपायचा प्रयत्न केलेला नाही, तर श्रीमंत वारसा असणाऱ्या या शहराचा आत्माच जपण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पुन:’ हे नाव स्वतःच भूतकाळाला केलेलं अभिवादन आहे, त्या जुन्या पुण्याकडे पुन्हा एकदा पाहण्याची ही संधी आहे. माझं ध्येय केवळ छायाचित्र दाखवण्याचं नाही, तर त्यांना जतन करण्याचं आहे — कारण हा वारसा म्हणजे आपण कोण आहोत याचाच अविभाज्य भाग आहे,” असे आदी

चोरडिया म्हणाले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments