पुणे : ईशान अमित गायकवाड यांनी सलग १३ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हेलिकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली.
ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झालेले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १३ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांचे आणि आमच्या गायकवाड स्वराज्यपरिवाराचे हे एक भावनिक नात निर्माण झाले आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभार ईशानने यावेळी मानले.
या हेलीकॅप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानचे राजर्षि शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासासारखाचा या स्मारक निर्मितीचा इतिहास देखील चित्तथरारक आहे.


