पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विजेत्या व निवडक चित्रांचे प्रदर्शन सणस मैदानासमोरील बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे आयोजित करण्यात आले. रंग रेषांमधून उमटलेल्या विविध छटा यानिमित्ताने पुणेकरांना पाहायला मिळाल्या.
विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा मंदिरात पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात प्रथम क्रमांकास रोख २१,००० रुपये द्वितीय क्रमांकास रोख ११,००० रुपये व तृतीय क्रमांकास रोख ५,००० रुपये असे एकूण १,०६,००० रुपयांची रोख बक्षिसे, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला महालक्ष्मी मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, विश्वकर्मा पब्लिकेशनचे सीईओ विशाल सोनी, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, समीर लडकत, मानसी लडकत, विश्वकर्मा विद्यालय संचालिका मधु शितोळे , विश्वकर्मा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलभा देशमुख, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन बालेवाडी, वाकड, हडपसर, बिबवेवाडी या चार ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. गट १) इ.५वी ते ७वी, गट २) इ. ८वी ते १०वी, गट ३) मूकबधिर विद्यार्थ्यांचा गट अशी स्पर्धा झाली. यामध्ये पहिल्या गटातून सानू पाटील (प्रथम), साई खरवीलकर (द्वितीय), रियांश शिंदे (तृतीय) आणि दुसऱ्या गटातून आशा चौधरी (प्रथम), जय थोरात (द्वितीय) आणि आर्या मोढवे (तृतीय) यांनी पारितोषिके पटकाविली. तर, चिल्ड्रन विथ सुपर पॉवर गटात श्वेता दास (प्रथम), सार्थक सिंग (द्वितीय) यांनी यश मिळविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सहिंद्रे यांनी केले.


