Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहनाईच्या मंगल सुरावटी आणि रंगले राग भीमवंतीचे अनवट सूर ७१ व्या...

शहनाईच्या मंगल सुरावटी आणि रंगले राग भीमवंतीचे अनवट सूर ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची उत्साही सुरुवात लोकेश आनंद आणि डॉ. चेतना पाठक यांच्या सादरीकरणाला दाद

पुणे, दि. १० डिसेंबर, २०२५ : शहनाईच्या मंगल वातावरण निर्माण करणार्‍या सुरावटींच्या साक्षीने आणि रसिकांच्या उत्साही प्रतिसादाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. महोत्सवाच्या प्रारंभीच सनईवरील मुलतानी रागातील सुरावटी, रसिकांचा उत्साही प्रतिसाद आणि गायिका डॉ. चेतना पाठक यांनी रंगवलेला राग भीमवंती यांच्या सादरीकरणातून रसिकांना प्रचलित आणि अनवट अशी सुरेल मेजवानी मिळाली.

 

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ७१ वे वर्ष आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलात सलग पाच दिवस महोत्सव रंगणार आहे. सुमारे ८ ते १० हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य स्वरमंडपात बुधवारी दिवंगत कलाकारांना आदरांजली अर्पण करून महोत्सवाचा प्रारंभ झाला.

 

महोत्सवाचे पहिले स्वरपुष्प दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या शहनाईवादनाने गुंफले गेले. लोकेश यांनी आपले वडील कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांकडे शहनाईवादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी राग मुलतानी सादर केला. सुरवातीचा विलंबित एकतालातील वादन विस्तार श्रवणीय होता. त्यानंतर गुरू पं. जसराज यांची ‘आये मोरे साजनवा’ ही रचना (द्रुत एकताल) त्यांनी ऐकवली. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी केहरवा तालात बनारसी धून पेश केली. त्यांना पांडुरंग पवार (तबला) आणि केदार जाधव (सहशहनाई) यांनी पूरक साथसंगत केली.

 

स्वरयोगिनी प‌द्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक यांनी राग भीमवंती (भीमपलास आणि मधुवंती यांचे मिश्रण) सादर करून गायनसेवा रुजू केली. ‘गाऊ मै हरीनाम’ आणि ‘लागे मोरे नैन’ (द्रुत त्रिताल) आणि त्याला जोडून तराणा (एकताल), यांचे सादरीकरण अतिशय प्रभावी झाले. राग मांजखमाजमधील ‘बलमा नें चुराई निंदिया’ हा दादरा पेश करून त्यांनी विराम घेतला. त्यांनी सादर केलेल्या सर्व रचना विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांच्याच होत्या. त्यांना पांडुरंग पवार(तबला), अमेय बिच्चू (हार्मोनिअम), फुमी नेगिशी आणि पल्लवी कुलकर्णी घोडके (तानतुरा) यांनी साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments