*
पुणे, दि.४ : महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत अनाथ, निराधार, निराश्रीत, बंद्यांची बालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, भिक्षेकऱ्यांची बालके, कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अचूक अर्ज भरण्याचे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालयाने केले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून बालकांना संस्थेऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यात येवून त्याचे कौटुंबिक वातावरणामध्ये पुनर्वसन करण्याचा प्रयत्न विभागामार्फत करण्यात येतो. राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी एकुण ७३ हजार ८९ इतक्या बालकांची माहिती आयुक्तालय स्तरावर प्राप्त करून घेण्यात आली होती. त्यानुसार या बालकांना प्रथमतः आयुक्तालय स्तरावरुन प्रायोगिक तत्वावर रक्कम अदा करण्यात आली असता काही कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होवू शकलेली नाही.
बँकेचा आयएफएसी कोड नमूद नसणे अथवा तो चुकीचा असणे, खाते क्रमांकामध्ये नमूद 0 (शुन्य) या अंकाऐवजी ‘ओ’ चुकीने नमूद झालेला असणे, खाते क्रमांकाच्या सुरुवातीला नमूद असलेला 0 एक्सेलशिटमधून आपोआप डिलीट होणे] बँक खात्याचे केवायसी केलेले नसणे, मागील अनेक महिन्यापासून बँक खात्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसल्याने बँकेने खाते बंद करून ठेवणे, नमूद केलेल्या नावातील शब्दलेखनात चुका असणे व खाते क्रमांक चुकीचा नमूद केलेला असणे इत्यादी कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
काही बँका बंद झालेल्या असून त्या बँकाचा समावेश इतर बँकामध्ये करण्यात आलेला असल्याने यापुर्वी नमूद केलेला आयएफएसी कोड असल्याने लाभाची रक्कम जमा न होणे, त्यामुळे ज्या बालकांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम झालेली नाही, अशा बालकांची लाभाची रक्कम जमा न होण्याची कारणे शोधून त्याची पुर्तता करण्यात येवून पुनःश्च रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यानुसार अद्यापर्यंत ७२ हजार ५ इतक्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये १६ कोटी २० लाख रुपयांचा निधी जमा झाल्याची खात्री जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, स्तरावरुन करण्यात आलेली आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत या प्रकरणी कोणतीही दिरंगाई झालेली नाही. या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वित्तीय वर्षाच्या प्रायोजकत्व, प्रति पालकत्व आणि आफ्टर केअर सेवा या योजनेअंतर्गत मंजूर निधीमधून कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या एकुण १० हजार २९० लाभार्थ्यांना नऊ महिन्यासाठीचा प्रत्येकी २ हजार ९०० रुपये प्रमाणे २६ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे, अशी माहितीही महिला व बाल विकास उपआयुक्त (बाल विकास) राहुल मोरे यांनी दिली आहे.


