पुणे – पुणे रेल्वे स्टेशन येथील प्रवाश्यांची वाढती गर्दी, सुरक्षा चिंताजनक झाली आहे. या गोष्टीचा रेल्वे मंत्रालय, पोलीस यंत्रणा, रेल्वे मंत्रालय, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी परिवर्तन या संस्थेचे डॉ.शैलेश गुजर यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी संबंधितांना पाठवले आहे.
पुणे रेल्वे स्टेशन हे राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक मानले जाते. दर २४ तासांत येथे सुमारे २४० हून अधिक प्रवासी गाड्या आणि जवळपास २०० मालगाड्यांचे आगमन-निर्गमन होते. फलाट क्रमांक १ ते ६ वरून प्रवासी चढ-उतार करतात. एका वेळी स्टेशन परिसरात किमान २० ते २५ हजार प्रवासी आणि इतर नागरिक उपस्थित असतात. बाहेरील परिसरात सुमारे ३ हजार दुचाकी व १ हजार चारचाकी वाहने उभी असतात, तर मुख्य रस्त्यांवरही मोठी वाहतूक आणि गर्दी असते.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुढे येतो. काही वेळा पेट्रोल किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या मालगाड्या प्रवासी फलाटांजवळ उभ्या केल्या जातात, अशी तक्रार आहे. एका कंटेनरमध्ये अंदाजे ७० हजार लिटर इंधन असते आणि एका इंजिनामागे ४० ते ४५ कंटेनर जोडलेले असतात. ( २८ लाख लिटर पेट्रोल) अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना — आग, स्फोट किंवा गळती — घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते.
तज्ज्ञांच्या मते, ज्वलनशील मालवाहतूक गाड्या शक्यतो स्टेशनच्या मागील यार्ड किंवा स्वतंत्र पार्किंग क्षेत्रात उभ्या करणे अधिक सुरक्षित ठरते. प्रवासी फलाटांवर अशा गाड्या उभ्या केल्यास धोका वाढू शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जोखीम व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, अग्निशमन साधने, नियमित तपासणी आणि स्पष्ट सुरक्षा प्रोटोकॉल यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
स्थानिक प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल आणि आपत्कालीन सेवा यांच्यात समन्वय वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे. वाढत्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार आणि अधिक मजबूत उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे अशी मागणी परिवर्तन चे डॅा शैलेश गुजर यांनी केली आहे.


