पुणे / अमरावती : आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात संगणक साक्षरता ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यावश्यक ठरली आहे. शहरांमध्ये डिजिटल सुविधा सहज उपलब्ध असताना ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अजूनही संगणक शिक्षणाच्या संधीपासून दूर राहावे लागते. मात्र योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील मुलेही कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत, असा विश्वास समाजात निर्माण होत आहे.
याच सकारात्मक विचारातून पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था’तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर “गाव तिथे संगणक ज्ञान, माई संगणक साक्षरता अभियान” राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान देणे, त्यांच्यामध्ये डिजिटल कौशल्य विकसित करणे आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आत्मविश्वासाने सहभागी होण्यास सक्षम बनवणे हा आहे. संगणक साक्षरतेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, माहिती आणि नव्या संधींचे अनेक दरवाजे उघडतील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील उपातखेडा येथे करण्यात आली आहे. येथे या अभियानातील पहिले “माई संगणक प्रशिक्षण केंद्र” सुरू करण्यात आले असून उपातखेडा ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या चारही गावांतील शाळकरी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाची प्राथमिक माहिती, डिजिटल कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी ब्रिंक्स इंडिया, मुंबई यांनी आर्थिक सहाय्य दिले असून ग्रामपंचायत उपातखेडा, ता. अचलपूर, जि. अमरावती यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण शिक्षणाबद्दलची संवेदनशीलता यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री केवलरामजी काळे, आमदार, मेलघाट विधानसभा क्षेत्र उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सीमा घाडगे, सचिव, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था, पुणे यांनी उपस्थित राहून या उपक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री सुधीरजी अरबट, गट विकास अधिकारी, पंचायत समिती अचलपूर, मा. श्री रामलाल काळे, सामाजिक कार्यकर्ता, मा. श्री रविन्द्र गणपत येवले, उपसरपंच ग्रामपंचायत उपातखेडा तसेच मा. श्री अमित बलिराम सोनारे, सरपंच ग्रामपंचायत उपातखेडा यांची उपस्थिती लाभली.
ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्यात ज्ञानाची आणि आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटवणारे “गाव तिथे संगणक ज्ञान, माई संगणक साक्षरता अभियान” हे अभियान पुढील काळात महाराष्ट्रातील अनेक गावांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे. या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची नवी पहाट उगवेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


