पुणे,१६ मार्च २०२६ : मूत्रपिंड निकामी झालेल्या तसेच हृदयाच्या रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शिअम जमा होऊन रक्तवाहिन्या अरुंद झालेल्या (ट्रिपल व्हेसल डिसीज) एका 60 वर्षीय रुग्णावर कॅल्शिअम ऑर्बिटल ॲथरेक्टॉमी ही प्रक्रिया लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केली. अरुंद रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट बसवण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठीची उच्च जोखमीची अँजिओप्लास्टी हॉस्पिटलच्या कार्डियाक सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. सुरज इंगोले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
60 वर्षीय पुरुष रुग्णाचे मुत्रपिंड निकामी झाले होते व ते नियमित डायलिसिसवर होता. मात्र डायलिसिस दरम्यान त्यांचा रक्तदाब कमी होत असे. सोबत हृदयाचे ठोके अनियमित होत असत आणि या लक्षणांवरून त्यांचे हृदय निकामी होण्याची शक्यता होती.
त्यामुळे डॉक्टरांनी या रुग्णाला अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. अँजिओग्राफी तपासणीत त्यांना ट्रिपल व्हेसल डिसीज (टीव्हीडी) असल्याचे निदान झाले.‘टीव्हीडी’ही एक गंभीर अवस्था असते ज्यामध्ये हृदयातील तीनही महत्त्वाच्या धमन्यांमध्ये लक्षणीय अडथळा निर्माण होऊन रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. या रुग्णामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम जमा होऊन त्या कडक झालेल्या होत्या आणि हृदयाची कार्यक्षमता सुमारे 20 टक्के इतकीच होती. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया करणे उच्च जोखमीची बाब होती. याच कारणामुळे शल्यचिकित्सकांनी हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेचा पर्याय रद्द केला.
याबाबत लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलच्या कार्डियाक सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. सुरज इंगोले म्हणाले की, रुग्णाची प्रकृती आणि गुंतागुंत लक्षात घेता आम्ही अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अत्यंत कडक आणि कॅल्शियमयुक्त रक्तवाहिन्या स्टेंट बसवण्यासाठी आधी मोकळे करणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही कॅल्शिअम ऑर्बिटल ॲथरेक्टॉमी ही कमीत कमी छेद असलेली वैद्यकीय प्रक्रिया रुग्णावर केली. या प्रक्रियेत बारीक नळीच्या (कॅथेटर) टोकाला डायमंड-कोटेड (हिऱ्याच्या सूक्ष्म कणांनी झाकलेले) उपकरण हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत पोहोचवतात. ते अतिशय वेगाने फिरते आणि एकाच वेळी ऑर्बिट म्हणजे वर्तुळाकार हालचाल करते.त्यामुळे रक्तवाहिनीच्या भिंतीवर जमा झालेल्या कॅल्शियमचे कडक अडथळे तुटू लागतात. त्यामुळे त्यानंतर डॉक्टरांना अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवणे सोपे जाते.
रक्तवाहिनी साफ झाल्यानंतर हृदयाच्या डाव्या बाजूची रक्तवाहिनी (लेफ्ट अँटेरिअर डिसेंडिंग आर्टरी) मध्ये स्टेंट बसवण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, या प्रक्रियेत आमच्या रुग्णालयात उपलब्ध असलेले इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड हे महत्वाचे मार्गदर्शक ठरले. ही कॅथेटर-आधारित,कमीत कमी छेद असलेली इमेजिंग प्रक्रिया असून उच्च वारंवारतेच्या ध्वनि लहरींचा वापर करून रक्तवाहिन्यांच्या आतून 360 अंशांचे तपशीलवार चित्र मिळते.
डॉ. इंगोले म्हणाले की उर्वरित रक्तवाहिनी मोकळी करण्यासाठी एक ते दोन महिन्यांनंतर आणखी एक अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर रुग्णाचे दुसऱ्याच दिवशी कोणत्याही गुंतागुंती शिवाय डायलिसिस झाले.ही स्थिती आणि केलेली प्रक्रिया दुर्मिळ नसली तरी अशा प्रकारची परिस्थिती उच्च जोखमीची आणि गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेमुळे पुण्यातील पूर्व भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या किंमतीत अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया उपलब्ध झाल्यामुळे रूग्णांना आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे.
डॉक्टरांच्या पथकात डॉ. सुरज इंगोले, भूलतज्ज्ञ डॉ.क्षितीज गायकवाड,रजिस्ट्रार डॉ.विष्णू जाधव व अनघा,कॅथलॅब कर्मचारी अमित,मीना,मनोजकुमार,कल्याण आदींचा
समावेश होता.


