Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी –...

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी – महापौर रवि लांडगे

इ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागासह विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

 

पिंपरी, दि. २० मार्च २०२६: पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षम, जलद आणि परिणामकारक पद्धतीने उपलब्ध झाल्या पाहिजेत. शहरातील नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, सुरू असलेल्या विकासकामांना गती देणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

इ क्षेत्रीय कार्यालयातील संत ज्ञानेश्वर महाराज सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

या बैठकीस विधी समितीच्या सभापती राणी माई पठारे, माजी महापौर तथा नगरसदस्य नितीन काळजे, नगरसदस्या सारीका गायकवाड, अर्चना सस्ते, श्रुती डोळस, नानी उर्फ हिराबाई घुले, भिमाबाई फुगे, कविता भोंगाळे, प्रा. सोनाली गव्हाणे तसेच नगरसदस्य सचिन तापकीर, कृष्णा सुरकुले, उदय गायकवाड, सागर गवळी, जालिंदर शिंदे, विराज लांडे उपस्थित होते.

 

याशिवाय आरोग्य विभागाचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह सहाय्यक आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

या बैठकीत आरोग्य, स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, कर संकलन, विद्युत तसेच इतर महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रलंबित कामे तसेच सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

नगरसदस्यांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्या तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, स्वच्छता व आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करणे, जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करणे आणि शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती देणे, यावर विशेष भर देण्यात आला.

 

प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणे तसेच प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी

नमूद केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments