६१ किलो वजनी गटातील माती विभागाच्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) कोल्हापूरच्या अजय कापडे याने साताऱ्याच्या गोरख कोळेकरचा १० -० तर पुण्याच्या अमोल वालगुडे याने पुणे शहराच्या अमित कुळालचा ११-० अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पुणे जिल्ह्याचा व मागील दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या अमोल वालगुडे हा पहिल्या फेरीत ७-२ (पाच) गुणांनी पिछाडीवर पडला होता. मात्र दुसऱ्या फेरीत अमोलने बचावात्मक आक्रमक पवित्रा घेत गुणांची कमाई करत हि लढत १०-८ अशा गुणाधिक्याने जिंकत तिसऱ्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर कोल्हापूरच्या राष्ट्रीय मल्ल अजय कापडेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत साताऱ्याच्या गोरख कोळेकर याने पुणे शहराच्या अमित कुलालवर ४-२ अशी मात करत कांस्यपदक जिंकले.
७९ किलो वजनी गटातील माती विभागाच्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) बीडच्या अविनाश शिंदे याने सोलापूरच्या प्रणव हांडेचा १२-२ तर दुसरी उपांत्य फेरी सोलापूरचा बिरुदेव बनसोडे आणि पुण्याचा अनिल कचरे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीची लढत सुरू असताना लढतीच्या दुसऱ्या फेरीत अनिल कचरेच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला लढतीतून माघार घ्यावी लागली. अन् बिरुदेव बनसोडेचा अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला.
अंतिम लढत हि सोलापूर शहराच्या बिरूदेव बनसोडे आणि बीडच्या अविनाश शिंदे यांच्या अत्यंत चुरशीची व उत्कंठावर्धक झाली. यामध्ये निर्णायक लढतीत दोघांनेही ५-५ असे समान गुण घेतले.परंतु अशा स्थितीत शेवटचा गुण घेणारा बिरुदेव बनसोडे सुवर्णपदक जिंकले. तर पुण्याचा अनिल कचरे हा सेमीफायनलमध्ये गंभीर जखमी झालेल्यामुळे कांस्यपदकाच्या लढतीसाठी गैरहजर राहिल्याने सोलापूरच्या प्रणव हांडे कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
——————————————————————–
६१ किलो वजनी गटातील गादी विभागाच्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) कोल्हापूरच्या विवेक धावडे याने धुळ्याच्या महेश चौधरीचा १०-० तर कोल्हापूर शहरच्या वैभव पाटील याने पुण्याच्या वेंकटेश देशमुखचा ११-० अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारत पदक निश्चित केले. अंतिम फेरीत कोल्हापूर शहराच्या वैभव पाटील याने कोल्हापूर जिल्ह्याच्या विवेक धावडेवर ११-१ अशी मात करत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली तर विवेक रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तर कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत सांगलीच्या पांडुरंग मानेने धुळ्याच्या महेश चौधरीचा ६-१ तर दुसऱ्या कांस्यपदकाच्या लढतीत सातारच्या अरु खांडेकरने पुण्याच्या व्यंकटेश बनकरचा पराभव करून कांस्यपदक जिंकले
७९ किलो वजनी गटातील गादी विभागाच्या उपांत्य
फेरीत (सेमीफायनल) सोलापूरच्या विकास करे याने कोल्हापूरच्या नितीन चव्हाणचा तर ठाण्याच्या सुरज मानेने सोलापूरच्या गोपीनाथ सुतारचा ८-४ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम फेरीत सोलापूरच्या विकास करे याने ठाण्याच्या सुरज मानेचा १०-० अशा गुणाधिक्याने पराभव करून सुवर्णपदक जिंकले तर सुरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर शहराच्या पृथ्वीराज बोडके याने सोलापूर शहराच्या गोपीनाथ सुतारचा १३-२ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले तर पुण्याच्या निखिल वाडेकर याने कोल्हापूरच्या नितीन चव्हाणचा १०-६ अशा गुणाधिक्याने पराभव कांस्यपदक पटकावले


