धायरी: “जगातील अनेक राष्ट्रांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती असली, तरी भारतामध्ये मात्र आपली महान आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सद्भाव यांमुळे शांतता टिकून आहे,” असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. संकेत देशमुख यांनी केले. धायरी येथील उंबऱ्या गणपती वस्ती हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू संमेलनात’ ते बोलत होते.
पवन मेडिकलजवळील पुणे महानगरपालिकेच्या मैदानावर रविवारी (२२ मार्च) सायंकाळी हे भव्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद इतिहासतज्ज्ञ डॉ. रमेश कांबळे यांनी भूषविले. यावेळी ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघयात्रा’ या सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, “पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण थांबवून आपण आपले हिंदू सण अभिमानाने साजरे केले पाहिजेत. ३१ डिसेंबरऐवजी गुढीपाडवा हाच आपला खरा नववर्षारंभ दिन आहे. हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक विचार आणि समृद्ध संस्कृती आहे.” यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा इतिहास आणि शंभर वर्षांतील सेवाकार्याचा आढावा घेत उपस्थितांना आपली आत्मशक्ती जागृत करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रमेश कांबळे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राष्ट्रासाठी जगले आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचे जतन केले. ‘जगा आणि जगू द्या’ हे आपले वैशिष्ट्य आहे, वैगुण्य नव्हे. शिवरायांचा हाच गौरवशाली इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो.” मातृशक्तीच्या प्रतिनिधी सौ. केतकीताई पांडे यांनी सणांच्या माध्यमातून संस्कृतीची ओळख जपण्याचे आणि ‘पंचपरिवर्तन’ बिंदूंद्वारे समाजात बदल घडवण्याचे आवाहन केले. श्री. पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांनीही हिंदू धर्माचे महत्त्व विषद केले.
– लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष :
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात छत्रपती ताराराणी विकास मंचाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या लाठीकाठीच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संमेलनस्थळी भाविसा साहित्य विक्री आणि गोसेवा उत्पादनांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. या प्रसंगी श्री. यशवंतबापू लायगुडे, श्री. गंगाधरजी भडावळे, श्री. विनायकराव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. माधवी देशपांडे व सौ. वैशाली देशमुख यांच्या दुर्गास्तोत्राने झाली. कु. ईशानी रानवडकर हिने वैयक्तिक गीत सादर केले. सूत्रसंचालन श्री. संकेत खळदकर यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. श्रीपाद कानडे यांनी केले. सौ. प्रियांका मालशे यांनी गायलेल्या पूर्ण ‘वंदे मातरम्’ने आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संमेलनास धायरी परिसरातील सुमारे ६०० नागरिक उपस्थित होते.
————————–


