Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही मराठी विश्वकोश मंडळाचे माजी...

आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत

मातृगौरव न्यास, अखिल मंडई मंडळ, ज्ञानेश्वरी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा मातृगौरव सन्मान सोहळा संपन्न

 

पुणे : प्रत्येक माणूस हा आपल्या आईसाठी कायमच लहान मूल असतो. त्यामुळे आजचा सन्मान हा मातृत्वाचा सन्मान असून, ती एक प्रकारची पूजाच आहे. मातेला माया शिकवावी लागत नाही; ती उपजतच असते. आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. जगाच्या उत्पत्तीपासूनच मानवजात मातृपूजक आहे. कृतज्ञता दुर्मिळ होत चाललेल्या या काळात मातृगौरव पुरस्कारासारखे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे मत मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

 

मातृगौरव न्यास, अखिल मंडई मंडळ आणि ज्ञानेश्वरी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व्या मातृगौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, दत्ता सागरे उपस्थित होते.

 

कार्यक्रमात शुभांगी शेठ, मालती गिरे, शैलजा पेठकर, लीला रणधीर, जयश्री वडके, मालती दाते, शुभदा ठाकूर, मंदाकिनी वारे, संध्या झरकर, जयश्री टापरे, उज्वला लवाटे, कीर्ती यार्दी आणि सुचेता देशपांडे या मातांचा सन्मान करण्यात आला. दत्तक मूल घेणारी माता आणि कॅन्सर सारख्या दूर्धर आजाराचा सामना करणाऱ्या मातेचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

 

पराग काळकर म्हणाले, मातृदिन आणि पितृदिन हे आजकाल फक्त मोबाईलच्या डीपीमध्ये दिसतात; प्रत्यक्ष वागण्यात मात्र त्यांचा अभाव जाणवतो. बाहेर जाऊन मुलांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केली जातात, पण घरातील संस्कार मात्र वृद्धाश्रमात ठेवले जातात आणि विकतचे संस्कार घरी आणले जातात. फ्लॅट संस्कृती वाढत असताना लोकांची मने संकुचित होत चालली आहेत आणि जन्मदात्रीला घरात स्थान मिळेनासे झाले आहे. आपण कृतीतूनच जन्मदात्यांना विस्थापित करतो, हे आपली मुले पाहत असतात. मातृसत्ताक व्यवस्था आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे,असेही त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद सराफ यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर गिरीश पोटफोडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments