Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील -...

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील – महापौर रवि लांडगे

नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शुभेच्छा

 

पिंपरी, दि. २५ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्याने रूजू झालेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने त्यांचा सभागृहाला परिचय करून देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून यशस्वी कामकाज करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी त्यांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या विशेष सभेला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर तसेच नगरसदस्य, नगरसदस्या, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष सभेत सुरुवातीला आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांचा परिचय करून देण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे शालेय शिक्षण जि. प. शाळा, देवळा तसेच सैनिक स्कूल, सातारा येथे पूर्ण केले आहे. ते २००६ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असून त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रशासनात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), जिल्हा परिषद कोल्हापूर व पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया व रायगड येथे जिल्हाधिकारी, तसेच भारताचे संरक्षण मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई येथे अतिरिक्त महानगर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त तसेच कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत, अशी माहिती परिचयामध्ये देण्यात आली.

 

तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रशासकीय काळात मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी केलेली विशेष कामगिरी याबाबत देखील सविस्तर माहिती देण्यात आली. प्रास्ताविक महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

 

….

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळालेले पुरस्कार

 

· मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे कार्यरत असताना, सन २०१५ मध्ये राज्यस्तरीय यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार, तसेच देशपातळीवरील रु. २५ लाखांचा पुरस्कार प्राप्त.

 

· कोल्हापूर येथे कार्यरत असताना, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुधार करण्यासाठी “कायापालट अभियान” प्रथमच सुरुवात केली, जी आता राष्ट्रीय पातळीवर कायाकल्प पुरस्कार म्हणून राबविली जात आहे.

 

· रायगड जिल्हाधिकारी असताना रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक.

 

· जिल्हाधिकारी गोंदिया असताना, नरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट श्रेणीचा पुरस्कार.

 

· मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी-२०२० अंतर्गत गृहनिर्माण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेला कोविड इनोव्हेशन पुरस्कार.

 

· कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत असताना एम.ई.डी.ए. यांनी आयोजित केलेल्या १६ व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन स्पर्धेमध्ये “महापालिका इमारती व रुग्णालयामध्ये ऊर्जा संवर्धन, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा व जलनिस्सारण” पुरस्कार प्राप्त.

 

· स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण मंत्रालय, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या फ्रिडम-टू-वॉक व सायकल स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांनी उत्कृष्ट आरोग्यासाठी भाग घेतला, त्यात देशात प्रथम क्रमांक मिळवला.

 

· महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागीय आयुक्त, कोकण विभाग कार्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.

 

………

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची आतापर्यंतची विशेष कामगिरी :

 

· कोल्हापूर येथे कार्यरत असताना, जिल्हा परिषद संचलित देशातील पहिली निवासी क्रीडा प्रशाला सुरू केली. गेल्या ८ वर्षांमध्ये ५५० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहेत.

 

· गोंदिया येथे कार्यरत असताना, दुर्मिळ अशा सारस पक्षाचे संवर्धन करण्यासाठी देशातील नामांकित छायाचित्रकारांना निमंत्रित करून सारस महोत्सव आयोजित केला आणि धानाच्या शेतात सारस पक्षाने टाकलेल्या अंड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना ‘सारस मित्र’ पुरस्कार सुरू केला. यातून सारस पक्षाचे संवर्धन होण्यास खूप मदत झाली.

 

· गोंदिया येथे बेघर असलेले व राज्यभर भटकंतीमुळे स्वतःचा पत्ता नसलेल्या नाथजोगी समाजाला मालकीची घरे देऊन स्वतःची वस्ती निर्माण करून दिली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments