पुणे दि. २७ माणसाची हुशारी केवळ भौतिक प्रगतीवरून नव्हे, तर त्याच्यातील संवेदनशीलता आणि वात्सल्यभावातून सिद्ध होते. समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहताना त्याची खरी सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. परमहंस नगर येथील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी सर्वच वक्त्यांनी ‘कुटुंब प्रबोधन’ हाच सामाजिक बदलाचा मुख्य आधार असल्याचे अधोरेखित केले.
आपल्या धर्माने कायमच नाविन्याची कास धरली. जे जे वाईट होतं ते टाकून दिलं. साधुसंतांनीही समाजातील दोष दूर केले. आपणही धर्माच्या, समाजाच्या हिताचे आहे तेच स्वीकारले पाहिजे. जे अयोग्य आहे त्याला ‘नाही’ म्हणता आले पाहिजे. त्यातूनच धर्मरक्षण शक्य होणार आहे.असे सांगत कुटुंबाचे महत्त्व विशद करताना शिंदे पुढे म्हणाले, अहंकार गेला की कुटुंब एक राहते. पण अहंकर आला की कुटुंबातील सदस्य दूर होतात. साधने वाढली पण कुटुंबातील स्नेहभाव कमी झाला. कुटुंब एकमेकांपासून दुरावली. पूर्वीच्या काळी साधनांचा अभाव होता पण प्रेम होते, सुख होते. आधुनिकीकरण, नाविन्य, नवीन तंत्रज्ञान, एआय हे सगळे स्वीकारा पण कुटुंबातील जिव्हाळा संपू देऊ नका अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली. आपल्या भाषणात त्यांनी कुटुंबातील विविध नात्यांचे महत्त्व विविध रंजक उदाहरणे देऊन सांगितले.
सामुहिक रामरक्षा पठणाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी , राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,रा.स्व.संघ परमहंस नगराचे संघचालक हिरामण जगताप,भाजप नगरसेवक किरण दगडे पाटील,ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भंडारे, धातूशास्त्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ उदयन पाठक, आदि मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘हिंदू जागरणाची १०० वर्षांची यात्रा’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
शिव-शंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे यांनी धर्मकार्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता विशद केली. हिंदू समाजात आणखी प्रगल्भता यायला हवी हे सांगतानाच त्यांनी समाजात धर्माचरण वाढविण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला.
दक्षिण भारतातील हिंदू जाणीवपूर्वक हिंदू पेहराव परिधान करण्याचा आग्रह धरतात. मात्र आपण अनेक गोष्टी विसरत चाललो आहोत. आपण आपले संस्कार, संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवेत. डॉ. हेडगेवारांसारख्या महापुरुषांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला म्हणून आज आपण हे दिवस पाहत आहोत. हिंदुस्थानात संघ आहे म्हणूनच हिंदूस्थानचे नाव अजून हिंदुस्थान आहे. संघ हा शिवछत्रपतींच्या विचारांचा आहे असेही हांडे यावेळी म्हणाले.
भारतीय संस्कृतीत कुटुंबाला सर्वोच्च स्थान असून सुदृढ समाजाची निर्मिती संस्कारक्षम मातांमुळेच होते, असे प्रतिपादन वैशाली भंडारे यांनी केले. जगात केवळ आपल्याच धर्मात आईला ‘जगज्जननी’ मानले जाते, कारण तीच भावी पिढीला घडवणारा मुख्य आधारस्तंभ आहे. पौराणिक काळाप्रमाणेच आजही समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची अद्भुत क्षमता केवळ स्त्रीशक्तीमध्येच एकवटलेली आहे. मात्र, आधुनिक काळातील आव्हाने पेलण्यासाठी विस्कळीत झालेली कुटुंब पद्धती पुन्हा सावरणे आणि तिचे महत्त्व जपणे ही काळाची गरज आहे. मातृवंदनेतूनच खऱ्या अर्थाने सुदृढ नागरिक आणि पर्यायाने बलशाली राष्ट्र निर्माण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतिहास आणि ‘स्व’ विसरल्यामुळे इराणसारख्या राष्ट्रांनी आपली मूळ ओळख गमावली, मात्र प्रबळ हिंदुत्वामुळेच भारत आजही टिकून आहे, असे मत यावेळी उदयन पाठक यांनी व्यक्त केले. भारतीय संस्कृती विज्ञान, धातूशास्त्र आणि नगररचना अशा सर्वच क्षेत्रांत जगाच्या पुढे होती, ज्याचा गौरवशाली वारसा आपण जपला पाहिजे. केवळ आक्रमणांचा नव्हे, तर त्या आक्रमणांवर मिळवलेल्या विजयाचा इतिहास शिकवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘स्व’ जागृतीसाठी आपली भाषा, भूषा आणि जीवनशैलीत हिंदुत्वाचे विचार अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.वंदे मातरमने व्याख्यानमालेची सांगता झाली.


