पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ५ व्या छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेत सांगलीचे एन.एस. सोती विधी महाविद्यालय विजेते तर पुण्याचे डी. ई.एस. विधी महाविद्यालय उपविजेते ठरले.
स्पर्धेचे उद्घाटन टिळक रस्त्यावरील डॉ. नितू मांडके सभागृहात झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, सहसचिव विकास गोगावले, नियामक मंडळ अध्यक्ष अॅड. सत्येंद्र कांचन, खजिनदार जगदीश जेधे,अॅड. तानाजी घारे, रघुनंदन जाधव, प्रा.विश्वनाथ पाटील, अमर शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश कालिदास नांदेडकर आणि सुनील वेदपाठक उपस्थित होते.
एन.एस. सोती विधी महाविद्यालयाच्या सुनृता कट्टी, शिवराज गावडे, सानिका बरगीर विजेते ठरले. डी. ई.एस विधी महाविद्यालयाचे अनन्या ओझा, सत्यजित पवार, अभिषेक आनंद हे उपविजेते ठरले. वसंतराव पवार विधी महाविद्यालय बारामती प्रथमेश वाघ याने सर्वोत्कृष्ट वकील (वादी) तर दयानंद विधी महाविद्यालय लातूर चा प्रसाद शेटे सर्वोत्कृष्ट वकील (प्रतिवादी) ठरला. श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाची गितु आठवनी हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकविले.
मंजुषा देशपांडे म्हणाल्या, महिला दिन दरवर्षी साजरा केला जातो. परंतु महिलांविषयीची, महिला वकील किंवा महिला न्यायाधीश यांच्या बद्दलची मानसिकता बदलली नाही. अजूनही वकील म्हटले तर पुरुषच असे मानले जाते. स्त्री आणि पुरुषांना संविधानाने समान हक्क दिले असले तरी लोकांचे स्त्रियांविषयी विचार फारसे बदलले नाहीत. संविधानाची रचना करताना त्यामध्ये १५ महिलांचा सहभाग होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यापासून महिलांचा सहभाग आहे, परंतु तरीही ७५ वर्षात स्त्रियांविषयीचे विचार बदलले नाहीत.
आजही न्यायाधीश म्हणून काम करताना अनेकदा मला हा अनुभव येतो. ऑफिसमध्ये अनेकदा खुर्चीवर बसलेली असताना देखील सर कुठे आहेत अशी विचारणा केली जाते किंवा कामाच्या ठिकाणी बाहेरगावी कुठे गेल्यावरही न्यायाधीश म्हणून स्त्री आहे हे लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. विधी महाविद्यालयात आज महिलांची संख्या लक्षणीय आहे हे पाहून आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बोकेफोडे यांनी आभार मानले.


