18 ऑगस्ट 2026
पुणे, 18 ऑगस्ट 2026 : “कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळवण्यापूर्वी अनेक प्रकारच्या अपयशांचा सामना करावा लागतो. अपयश स्वीकारता आले पाहिजे. अपयश आले तर माघार न घेता पुढे जाण्याची कला यशस्वी बनवते. आपल्या चुका समजून घ्या आणि त्या सुधारून अपयशाच्या चुकांमधून यशस्वी व्हायला शिका” असे सल्ला प्रसिद्ध अभिनेते व उद्योजक विवेक ओबेरॉय यांनी दिला .
एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, कोथरूड, येथे विद्यार्थांनी आयोजित केलेल्या “टेडेक्स” या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी इस्रोचे माजी संचालक डॉ. माधव ढेकणे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, लेखक डॉ. कुणाल बुच, अभिनेते अशोक समर्थ, गीतकार प्रगती नागपाल, क्रीडा निवेदक रोशन शेट्टी, लेट्स गेमचे प्रमुख शंतनु बासू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि टेडेक्सचे मुख्य समन्वयक डॉ. सागर कोळपकर उपस्थित होते.
सिनेमा, विज्ञान, व्यवसाय, क्रीडा, संगीत आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रेरणादाई व्यक्तीमत्वांशी संवाद आणि तरुणाईला प्रेरणा मिळावी म्हणून डॉ राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली टेडेक्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विवेक ओबेरॉय म्हणाले, “आपल्याला कंफर्ट झोन हवासा वाटतो पण तो प्रगतीचा अडथळा असतो. ते तोडून विद्यार्थ्यांनी नवीन जग अनुभवावे. वाईट काळात घाबरू नका आणि चांगल्या काळात भरकटू नका.”
डॉ. माधव ढेकणे म्हणाले, ” अवकाश संशोधनात भारत अग्रेसर झाला असून चंद्रावर संशोधन करण्यासाठी पूर्णवेळ मनुष्य पाठवण्यास आपण प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी नवकल्पना घेऊन नवनवीन गोष्टींचे प्रयोग करावेत.”
डॉ. राहुल कराड म्हणाले, “देशात क्रीडा संस्कृती विकसित करण्याची गरज आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एनसीसी अनिवार्य करणे गरजेचे आहे. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच मन, मस्तक आणि शरीर, सुदृढतेसाठी कटिबध्द आहोत.”
डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले, “अपुरी झोप, मानसिक ताण, चुकीचा आहार, व्यसने व बदलत्या जीवनपद्धतीमुळे तरुणाईमध्ये हार्ट अटॅक चे प्रमाण वाढतांना दिसत आहे. चांगले आरोग्य आपली संपत्ती आहे. अशा वेळेस हार्ट अटॅक बाबत जनजागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे.”
विद्यार्थी ईशान सक्सेना, हर्षल प्रधान, आदित्य सिंग, देवांग कौशिक, झारा अहमद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सागर कोळपकर यांनी प्रास्ताविक केले.
देवांश अजयकुमार आणि अक्षिता सक्सेना यांनी सूत्रसंचालन तर ध्रुव मव्हारी याने आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड पुणे.


