Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedरांगोळ्यांतून उभा राहिला शिवकालीन इतिहास ‘शिवसृष्टी’ प्रदर्शनात गड-किल्ले, शस्त्रसामग्री, जहाजांच्या प्रतिकृती...

रांगोळ्यांतून उभा राहिला शिवकालीन इतिहास ‘शिवसृष्टी’ प्रदर्शनात गड-किल्ले, शस्त्रसामग्री, जहाजांच्या प्रतिकृती आणि शिवछत्रपतींचा दिमाखदार आविष्कार

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचा रंगोत्सव उलगडणारे ‘शिवसृष्टी’ हे गालिचा रांगोली प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. देखण्या रांगोळ्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास जणू सजीव झाला असून, गड-किल्ल्यांवरील देवी-देवता, शिवकालीन शस्त्रसामग्री, अलंकार आणि सिंहासनावर आरूढ शिवछत्रपतींचे दिमाखदार दर्शन पुणेकरांना झाले.

 

यासोबतच युनेस्कोने घोषित केलेल्या १२ किल्ल्यांच्या प्रभावी प्रतिकृती आणि गडकिल्ल्यांची माहितीपूर्ण छायाचित्रे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे आणि नुमवि प्रशाला यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आणि शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका निवेदिता एकबोटे, नगरसेवक अपूर्व खाडे, इतिहास अभ्यासक श्रमिक गोजमगुंडे तसेच राष्ट्रीय कला अकादमीचे रोमा लांडे आणि सर्व कलाकार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रदर्शनात एकूण १८ रांगोळ्या, १२ किल्ल्यांच्या प्रतिकृती तसेच ५१ किल्ल्यांची छायाचित्रे व त्यांची सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन दिनांक ३१ मार्च पर्यंत रात्री ९ वाजेपर्यंत सुरू आहे.

 

यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, रांगोळी ही क्षणभंगुर असली तरी कलाकार ती अत्यंत आत्मीयतेने साकारतो. हीच कला कलाकाराला मानसिक स्थैर्य, समर्पण आणि त्यागाची शिकवण देते.

 

अमित गायकवाड म्हणाले, जगात कोणत्याही राजाची जयंती ज्या भव्यतेने साजरी होत नाही, त्या भव्यतेने पुण्यात शिवजयंती साजरी केली जाते. पुण्याने मांडलेल्या संकल्पना किती व्यापक होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवजयंती महोत्सव समितीची भव्य मिरवणूक.

 

श्रमिक गोजमगुंडे, निवेदिता एकबोटे आणि अपूर्व खाडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माने यांनी केले, तर सूत्रसंचालन अश्विनी गडकरी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments