Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा राज्यभर यशस्वीपणे संपन्न*

*उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा राज्यभर यशस्वीपणे संपन्न*

 

 

पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे पार पडली.

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत असाक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या वर्षात उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा राज्यातील सर्व युडायस प्राप्त शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ व बंगाली या नऊ माध्यमांतून घेण्यात आली.

 

या परीक्षेत निकषानुसार उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. या चाचणीमुळे आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण व कुटुंब कल्याण यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार असून त्यांच्या जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे.

 

यापूर्वी दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे ५ लाख असाक्षरांनी सहभाग नोंदविला होता. तर यंदा दि. २९ मार्च २०२६ रोजी सुमारे १.२३ लाख असाक्षर व्यक्तींनी नोंदणी केली असून त्यापैकी अंदाजे १ लाख परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

 

या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनीही परीक्षेसाठी शुभेच्छा देत असाक्षरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.

 

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा परीक्षा निरीक्षक’ म्हणून शिक्षण संचालनालयातील संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी भेटी देऊन परीक्षेचे निरीक्षण केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य (डायट), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली.

 

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देखील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. राज्यातील माध्यम प्रतिनिधींनी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली. तसेच शिक्षक संघटना, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सुयोग्य नियोजन करून परीक्षा यशस्वीपणे पार पाडली.

 

या सर्व संबंधितांचे शिक्षण संचालक (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. कृष्णकुमार पाटील यांनी अभिनंदन व आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments