Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

किल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

 

*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेने दुमदुमला पुरंदर किल्ला; संगीत, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा जागर*

 

पुणे, दि. १५ मे २०२६ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ऐतिहासिक किल्ले पुरंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या “जयतु शंभू” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला.

 

सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात ढोल-ताशांच्या गजरात आणि राष्ट्रभक्तीपर गीतांच्या सुरावटींमध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदानावर आधारित नेत्रदीपक नाट्यरूपांतरे, गायन, वादन तसेच पारंपरिक कलाप्रकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्यपरंपरेचे प्रभावी दर्शन घडले.

 

कार्यक्रमामध्ये विविध कलाकारांनी सादर केलेल्या ऐतिहासिक प्रसंगांमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले योगदान प्रभावीपणे उलगडण्यात आले. किल्ले पुरंदराच्या ऐतिहासिक साक्षीने साकारलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये अभिमान, प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमास इतिहासप्रेमी, युवक, विद्यार्थी, कला रसिक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी” आणि “धर्मवीर संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

 

सदर कार्यक्रम मा. श्री. ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच मा. श्री. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

 

महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि शौर्यपरंपरेचा जागर घडविणाऱ्या “जयतु शंभू” या कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमातून नव्या पिढीमध्ये राष्ट्राभिमान, इतिहासाविषयी आदर आणि स्वराज्याच्या विचारांची जागृती निर्माण झाली. भविष्यातही अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे संवर्धन करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments