Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedखासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक – डॉ....

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक – डॉ. किरण पाटील* 

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका, वृत्तसेवा): राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी त्यांच्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक असून, यामुळे पशुवैद्यकीय सेवांची अचूक संख्यात्मक माहिती उपलब्ध होऊन सेवांचा दर्जा व गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन आयुक्त तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी केले.

 

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी, कृत्रिम रेतन सेवांमध्ये पारदर्शकता आणि नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंग या विषयांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

डॉ. पाटील यांनी उच्च उत्पादनक्षम पशुधन वाढीसाठी कृत्रिम रेतन प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगत, खासगी सेवादात्यांना पशुसंवर्धन विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

 

कार्यशाळेत बायफ, पुणेचे डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीतील अनुभव मांडले, तर चितळे-ABS जेनस प्रा. लि.चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी ‘जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन’ या प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. तसेच सहाय्यक आयुक्त डॉ. राजू कोलते यांनी भारत पशुधन प्रणालीच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमास विविध तज्ज्ञ, सेवा पुरवठादार व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खुल्या चर्चेनंतर कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त डॉ. प्रशांत भड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments