पुणे शहर वाहतूक विभागाने भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी. डी वरील अभिनय स्कूल ते नवले ब्रिज या दरम्यान सर्वसामान्य वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ४० किमी प्रतितास निश्चित केली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हा आदेश लागू केला असून, अत्यावश्यक सेवांतील वाहने (अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका आदी) यांना या वेगमर्यादेतून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी या मार्गावरील वेगमर्यादेबाबतचे सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी स्पीडोमीटर नियमित तपासून मार्गावरील सूचना फलक व वाहतूक चिन्हांचे पालन करावे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
00000


