पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, पुणे शहराच्या वतीने प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक वारी अभियानांतर्गत पुणे शहरातील विविध भागांसह दिघी ते दिवेघाट या पालखी मार्गावर स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले. तब्बल ४०० हून अधिक कार्यकर्त्यांनी पालखी मार्गावरील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून वारकरी आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या अभियानामागील प्रेरणा मुंबई क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख संजय मुरदाळे यांची असून, संपूर्ण अभियानाचे नियोजन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अभियानात येरवडा भाग मंत्री हनुमंत खांदवे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० कार्यकर्ते सहभागी झाले. कसबा भाग मंत्री शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी वारीमध्ये प्लास्टिक वापर करू नका, स्वच्छता विषयी जनजागृती केली. तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करून प्लास्टिक संकलन केले.
पश्चिम विभाग मंत्री केतन घोडके आणि विभाग सहमंत्री विजय कांबळे यांच्या पुढाकाराने शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच हडपसर भाग मंत्री राजेंद्र शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी पालखी मार्गावर प्लास्टिक संकलन करून पर्यावरणपूरक वारीचा संदेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी वारकरी, अन्नदान करणाऱ्या संस्था आणि नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळावा, कचरा कचरापेटीत टाकावा, पालखी मार्ग स्वच्छ ठेवावा आणि पर्यावरणपूरक वारी घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
स्वच्छ वारी पर्यावरणपूरक वारी या संकल्पनेतून विश्व हिंदू परिषद दरवर्षी हा उपक्रम राबवत असून, यंदाही वारकरी आणि नागरिकांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी सांगितले.


